मुंबई 18 ऑगस्ट: पार्थ प्रकरणानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. पवार कुटुंबांमध्ये सगळंच काही आलबेल नाही अशीही चर्चा होती. मात्र काटेवाडीतल्या स्नेहभोजनानंतर सगळ्या वादावर पडदा पडल्याचं बोललं जातं. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी अजित पवारांचं कौतुक केलं आहे. अजित दादांची कामाची एक स्टाईल आहे. ते तडाफडकी निर्णय घेतात असं कौतुक रोहित पवार यांनी ट्विटरवरून केलं आहे.
मतदारसंघातल्या काही कामानिमित्त रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. ते म्हणाले, काही मतदारसंघातल्या कामानिमित्त दादांना भेटलो. हे प्रश्न बारकाईने समजून घेत त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. कोणतंही काम घोळत न ठेवता थेट निर्णय घेण्याची दादांची स्टाईल असून ती मला भावते. त्यानुसार या प्रश्नांवरही निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.
शरद पवार यांनी पार्थ यांना फटकारल्यानंतर त्याची सर्वत्र चर्चा झाली. रोहित पवार हे त्यावर काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र पवार साहेबांच्या प्रतिक्रियेवर मी काहीही बोलणार नाही असं रोहित पवारांनी म्हटलं होतं.
मतदारसंघातील व इतर प्रश्नांबाबत @AjitPawarSpeaks दादांना भेटलो.हे प्रश्न बारकाईने समजून घेत त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.कोणतंही काम घोळत न ठेवता थेट निर्णय घेण्याची दादांची स्टाईल असून ती मला भावते. त्यानुसार या प्रश्नांवरही निर्णय होईल,अशी अपेक्षा आहे. pic.twitter.com/FBfYo3JxwY
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 18, 2020
रोहित पवारांनी विधानसभा निवडणूक लढविण्यापासूनच पार्थ आणि रोहित यांच्यात शितयुद्ध असल्याची चर्चा होती. मात्र त्याचा दोघांनीही इन्कार केला आहे. रोहित पवारांनी अजित दादांची घेतलेली भेट आणि त्यानंतर केलेलं कौतुक याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rohit pawar