रोहित पवारांनी केली लसीकरणाची 'पोलखोल', मोदी सरकारला केली विनंती!

रोहित पवारांनी केली लसीकरणाची 'पोलखोल', मोदी सरकारला केली विनंती!

'आपल्या देशात लसीकरण सुरु झाल्यापासून आपला दिवसाचा सर्वाधिक वेग 45 लाख एवढा राहिलाय. या वेगाने गेलो तरीही आपल्याला 14 महिने लागतील'

  • Share this:

मुंबई, 21 एप्रिल :  राज्यात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेनं थैमान घातले आहे. संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारने लसीकरणावर (corona vaccine) जोर दिला आहे. पण आधीच लसीकरणाचा तुटवडा असताना 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण आपल्याकडे अत्यंत किरकोळ पद्धतीने लसीचे उत्पादन सुरू आहे, अशी आकड्यानिशी पोलखोल राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे. तसंच, केंद्राने आता प्राथमिकता ठरवावी, अशी विनंतीही केली आहे.

रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून लसीकरणाची आकडेवारी आणि तिचे उत्पादन किती प्रमाणात केले जात आहे, याची वस्तुस्थिती मांडली आहे.

'आपल्या देशात केवळ 10.96 कोटी लोकांना पहिला डोस तर 1.70 कोटी लोकांना दुसरा डोस असे एकूण 138 कोटी लोकसंख्येपैकी केवळ 12.66 कोटी डोस पूर्ण केले आहेत. 5 एप्रिल रोजी आपण सर्वाधिक म्हणजे 45 लाख लोकांचे लसीकरण केले होते. नंतरच्या काळात मात्र आपण लसीकरणाचा वेग वाढवू शकलो तर नाहीच मात्र तो मंदावला ही वस्तुस्थिती आहे. 18 एप्रिल रोजी आपण केवळ 10 लाख लोकांचं लसीकरण केलं, यावरून लसींचा तुटवडा किती आहे याचा अंदाज येतो' असं रोहित पवार म्हणाले आहे.

रेमडेसिवीर निर्माता कंपन्यांचं महत्त्वपूर्ण पाऊल; रुग्णांना देणार मोठा दिलासा

जगभरातील सर्वच देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता ही अधिक असल्याचे दिसून आले. त्यामुळे भारतातही दुसरी लाट येणार हे सर्वश्रुत होतं. त्यामुळे मागील एक वर्षात आपण जास्तीत  जास्त प्रमाणावर लसीकरण करणं गरजेचे होते. राज्यांनी लसीकरणाची क्षमताही वाढवली परंतु लस नसल्याने अनेक लसीकरण केंद्रे बंद झाली. पुरेसा वेळ व मागील वर्षाचा वाईट अनुभव गाठीशी असतांनाही भारतात लसीचा तुटवडा निर्माण होणं अपेक्षित नव्हतं. त्यामुळं आपलं लसीकरणाचं धोरण चुकलं का? लसींची मागणी आणि पुरवठा याचा अंदाज केंद्र सरकारला आला नाही की कोरोनावर मात केल्याच्या अविर्भावात केंद्र सरकारने लसीकरणाकडं दुर्लक्ष केलं? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थितीत केला.

गेल्यावर्षी टेस्ट कीट तयार करणाऱ्या कंपन्यांना मान्यता देताना खूप उशीर झाल्याने आपण टेस्टिंगचा अपेक्षित वेग वाढवू शकलो नाही. यंदा लसीकरणाच्या बाबतही आपण त्याच चुकीची पुनरावृत्ती केली. सध्याच्या घडीला आपली लसनिर्मिती क्षमता महिन्याला 7 ते 8 कोटीच्या घरात आहे, म्हणजेच आपण दिवसाला केवळ 25 लाख लोकांचे लसीकरण करू शकतो आणि याच वेगाने आपण  आतापर्यंत लसीकरण केलं आहे. परिणामी उत्पादनाअभावी आपण वेगाने लसीकरण करू शकलो नाही. त्यातही आपण मार्च 2021 अखेर 6. 40 कोटी लसी निर्यात केल्या, म्हणजेच भारतात लस कमी पडण्यामागे कमी उत्पादनाबरोबरच वितरणाचे चुकलेले नियोजनही  कारणीभूत आहे. याचं उदाहरण द्यायचं झाल्यास रेमेडीसीवीरच्या निर्यातीवर बंदी घालण्यास वेळ झाला तसंच रेमेडीसीवीरच्या कच्च्या मालावरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय अखेर काल घेण्यात आला. या विलंबाची किंमत सामान्य रुग्णांना मोजावी लागते असते.आंतराष्ट्रीय संबंध महत्वाचे आहेत, यात काही शंका नाही पण आज देशातील नागरिकांचे प्राण वाचवणे ही प्राथमिकता असली पाहिजे, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला.

आपण 1 मे पासून 18 वर्षावरील लोकांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. मात्र यात ही जास्तीचा बोजा राज्यांवर टाकण्यात आला. केंद्राने लसीकरणाचं टार्गेट वाढवलं हे खरंय पण इतक्या जास्त लसी येणार कुठून याचं उत्तर दिलं नाही. त्याचबरोबर 1 मे नंतर होणाऱ्या लसीच्या वितरण व्यवस्थेवर कटाक्षाने लक्ष देणं गरजेचं आहे. साठेबाजीसारखा जो प्रकार रेमेडीसीवीरबाबत घडला ते लसींच्या बाबतीत घडू नये यासाठी या सर्व गैरप्रकारांना रोखणं ही केंद्र व राज्यांची संयुक्त जबाबदारी असेल. हे टार्गेट पूर्ण करायचं ठरवलं तरी देशभरात आपल्याला दोन्ही डोससाठी जवळपास 200 कोटी डोस लागतील. आजच्या दिवशी आपण केवळ 20 लाख लोकांचं लसीकरण पूर्ण केलं. हा वेग राहिला तर 190 कोटी डोस पूर्ण करायला आपल्याला 31 महिने म्हणजेच जवळपास 2.5 वर्षे लागतील, असंही रोहित पवार म्हणाले.

आई कुठे काय करते?' फेम 'संजना'चा HOT अवतार; फोटो होतायेत VIRAL

आपल्या देशात लसीकरण सुरु झाल्यापासून आपला दिवसाचा सर्वाधिक वेग 45 लाख एवढा राहिलाय. या वेगाने गेलो तरीही आपल्याला 14 महिने लागतील. कोरोनाचे येणारे स्ट्रेन्स हे लसींची परिणामकारकता कमी करणारे असतील, त्यामुळं आपल्याला अत्यंत वेगाने लसीकरण पूर्ण करावं लागेल. जानेवारी 2022 पर्यंत अपेक्षित लसीकरण पूर्ण करायचं असल्यास आपल्याला 67 लाख डोस दररोज दयावे लागतील तर महिन्याच्या जवळपास 20 कोटी लसी लागतील. सध्याच्या घडीला 'सिरम'ची क्षमता महिन्याला 6 ते 7 कोटी लसींची आहे त्याच बरोबर 'भारत बायोटेक'ची एका महिन्याची क्षमता ही केवळ 60 लाख डोस इतकी आहे, जी मे 2021 अखेर वाढून 1.1 कोटी प्रतिमहिना तर 2021 अखेरीस 5.8 कोटी प्रतिमाह होण्याचा अंदाज आहे. ही आकडेवारी पाहता आपल्याला लागणाऱ्या लसींच्या संख्येपेक्षा उत्पादन अत्यंत किरकोळ आहे, अशी आकडेवारी रोहित पवारांनी दिली.

गेल्या अनेक दिवसांपासून 'भारत बायोटेक'सह 'सिरम'ही भांडवला अभावी त्यांच्या क्षमतेच्या केवळ अर्ध्याच लसींचं उत्पादन घेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या कंपन्या केंद्राकडे आस लावून बसल्या होत्या मात्र निर्णय घेण्यास विलंब झाला. अमेरिकेतून होणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा थांबल्याने 'सिरम'च्या व्यवस्थापनाला थेट अमेरिकेच्या अध्यक्षांना ट्विट करावं लागलं, जे काम परराष्ट्र खाते आणि केंद्र सरकारने करणं अपेक्षित आहे, ते काम लसनिर्मिती करणाऱ्या खाजगी कंपनीला करावं लागतं, हे दुर्दैवी आहे. Sputnik व Pfizer कंपनीच्या लसी अनेक देशांमध्ये प्रभावीपणे वापरल्या जात असतांनाही भारतात अजूनही या लसी आल्या नाहीत. Johnson's & Johnson's ची ही लस चांगली असल्याचं समोर आलं आहे. याबाबत केंद्राने त्वरित निर्णय घ्यायला हवेत, असा सल्लाही रोहित पवारांनी दिला.

IPL 2021: पुन्हा चहरचा कहर! पंजाबनंतर कोलकाताला दाखवला हिसका

हाफकिन मुंबई, आयआयएल हैदराबाद, बीआयबीएल बुलंदशहर या तीन सरकारी संस्थाना केंद्र सरकारने लस निर्मितीसाठी नुकतीच परवानगी दिलीय. हा निर्णय फेब्रुवारी अखेरपर्यंत व्हायला हवा होता, परंतु दुर्दैवाने खूप उशिरा हा निर्णय झाला. त्यामुळे आता येणाऱ्या काळात तरी केंद्र सरकारने अजून काही सरकारी तसेच खाजगी कंपन्यांनाही तंत्रज्ञान हस्तातर तसेच भांडवल पुरवठा करून लस निर्मितीचा वेग वाढवणं गरजेचं आहे. आज दिवसाला हजारो लोक मरत असतांना व रुग्णांचा आकडा लाखोंच्या घरात जात असतांना केंद्रसरकारला काही निर्णायक पावले उचलावी लागतील नाहीतर या रोगावर नियंत्रण मिळवणं अशक्य होईल, याचं भान असणं गरजेचं आहे. म्हणून आता तरी केंद्र सरकारने आपल्या प्राथमिकता ठरवाव्यात आणि या प्राथमिकतांचीच आज देशाला खरी गरज आहे, अशी विनंतीही रोहित पवारांनी केली.

Published by: sachin Salve
First published: April 21, 2021, 11:51 PM IST
Tags:

ताज्या बातम्या