राष्ट्रवादीचेही 'मिशन मुंबई', रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?
राष्ट्रवादीचेही 'मिशन मुंबई', रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?
मुंबई पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुंबईत राष्ट्रवादीने मार्च महिन्यातच हालचालींना सुरुवात केली. मुंबईत राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढायला हवी, अशी भूमिका बऱ्याच वेळा शरद पवार यांनी बोलून दाखवली आहे.
मुंबई, 24 नोव्हेंबर : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला (Mumbai Municipal Corporation election) अजून दीड वर्षांचा कालावधी आहे. मात्र, आतापासूनच भाजपने (BJP) मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षानेही मुंबईत आपली ताकद वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar)यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष विस्तारावर जास्त भर दिला आहे. विधानसभा निवडणुकीत मोठी गळती झाल्यामुळे राष्ट्रवादीने सावध पावलं टाकतं, नव्याने नियोजन केले आहे. मुंबई पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुंबईत राष्ट्रवादीने मार्च महिन्यातच हालचालींना सुरुवात केली. मुंबईत राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढायला हवी, अशी भूमिका बऱ्याच वेळा शरद पवार यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळेच यंदाच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. अहमदनगरमधील जामनेरमधून रोहित पवार हे आमदार म्हणून निवडून आले. रोहित पवार यांच्या नावाने राष्ट्रवादीला नवा चेहरा मिळाला आहे. त्यामुळे मुंबई पालिकेच्या निवडणुकीची धुरा ही रोहित पवारांकडे देण्यात येण्याची शक्यता आहे, असं वृत्त दैनिक लोकमतने दिले आहे.
मुंबईत राष्ट्रवादीची ताकद आता मर्यादित राहिली आहे. राष्ट्रवादीत राहून आमदार आणि मंत्रिपद भुषवणारे सचिन अहिर निवडणुकीपूर्वी सेनेत दाखल झाले होते. तर संजय दिना पाटील यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात उघडपणे नाराजी जाहीर करत भिडले होते. तर दुसरीकडे उत्तर मुंबईतही राष्ट्रवादी सोडून प्रकाश सुर्वे यांनी सेनेत प्रवेश केला होता.
दोन्ही मोठ्या नेत्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यामुळे राष्ट्रवादीत पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे ही पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादीने अनेक विकास कामांचे नियोजन केले आहे. या कामातून राष्ट्रवादीचा जनाधार वाढवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याकडे मुंबईचे अध्यक्षपद आहे. त्यामुळे मंत्रिपद आणि अध्यक्षपद दोन्हींचा वापर करून ते कामाचे धोरण कसे राबवता हे पाहण्याचे ठरणार आहे.
मलिक यांनी मुंबई कार्यक्रमाचा सपाटा लावला होता. पण लॉकडाउनमुळे याला खिळ बसली. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी मुंबई पालिकेच्या निवडणुकीच्या जबाबदारीसाठी रोहित पवार यांचे नाव पुढे केले आहे. अजित पवार हे सुद्धा अनेक मेळाव्यात हजर राहिले आहे. त्यामुळे अजित पवारांची छाप मेळाव्यात पाहण्यास मिळाली. नेत्यांमधील संघर्ष होऊ नये म्हणून सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याकडे जबाबदारी दिल्याची चर्चा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.