Home /News /mumbai /

इंदिरा गांधींच्या भेटीवरून वाद... जाणून घ्या, कोण होता मुंबईचा पहिला डॉन करीम लाला?

इंदिरा गांधींच्या भेटीवरून वाद... जाणून घ्या, कोण होता मुंबईचा पहिला डॉन करीम लाला?

करीम लालाची दहशत एवढी होती की त्याने दाऊद इब्राहिमला मुंबईच्या रस्त्यांवर सळो की पळो करू सोडलं होतं.

    मुंबई,16 जानेवारी: शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुण्यात झालेल्या मुलाखतीत भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी या करीम लालाला (Karim Lala)  भेटण्यासाठी जात होत्या, असा दावा केला. त्यामुळे करीम लाला चर्चेत आला आहे. एवढेच नाही तर संजय राऊतांच्या खळबळजनक वक्तव्यामुळे राज्यासह देशातील राजकीय वातावरण तापले आहे. करीम लाला नेमका कोण होता, याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. करीम लाला हा मुंबईचा पहिला माफिया डॉन असल्याचे बोललं जातं. असं म्हणतात की, जेव्हा दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) जन्मही झाला नव्हता. तेव्हा करीम लाला मुंबईवर वर्चस्व गाजवत होता. कोण होता करीम लाला? करीम लालाने तस्करीच्या माध्यमातून अमाफ मालमत्ता कमवली होती. करीम लालाविषयी असं बोललं जातं की, त्याने खूप संपत्ती कमवली होती. काही प्रसंगी तो गरिब आणि गरजूंची आर्थिक मदतही करत होता. करीम लाला याने थोडक्यात आपली प्रतिमा 'रॉबिनहूड'सारखी केली होती. खरंतर हाजी मस्तान याला मुंबईचा पहिला डॉन समजलं जातं. मात्र करीम लालाचं हाजी मस्तानच्याही आधी मुंबईवर वर्चस्व होतं. करीम लालाची दहशत एवढी होती की त्याने दाऊद इब्राहिमला  मुंबईच्या रस्त्यांवर सळो की पळो करून सोडलं होतं. या घटनेची गुन्हेगारी जगतात आजही आठवण काढली जाते. असे सांगितले जाते की, 'जंजीर' या चित्रपटात अभिनेता प्राण यांची 'शेर खान' ही भूमिका ही करीम लालावर आधारित होती. करीम लाला याला लोक शेर खान असंही संबोधत होते. चित्रपटातील प्राण यांची वेशभूषाही करीम लाला याच्यासारखीच होती. करीम लाला नेहमी सफेद पठानी सूट परिधान करत असे. 7 फूट उंच आणि भारदस्त व्यक्तीमत्व यामुळेच लोकांच्या मनात त्याच्याबद्दल भीती निर्माण होत असायची. कालांतराने तो आपल्यासोबत काठी ठेवायचा. करीम लालाने 50 ते 80 च्या दशकापर्यंत मुंबईवर राज्य केलं. करीम लाला ही अशी व्यक्ती होती की, त्याने मुंबईला 'डॉन' या शब्दाचा अर्थ सांगितला. करीम लालाच्या पठान गॅंगची संपूर्ण मुंबईभर दहशत होती. करीम लाला आला होता अफगानिस्तानातून करीम लाला याचं खरं नाव अब्दुल करीम शेर खान असं होतं. सन 1911 मध्ये अफगानिस्तानात त्याचा जन्म झाला. तो पश्तून समाजातून होता. पश्तून समाजाचा शेवटचा राजा होता. वयाच्या 21 व्या वर्षी त्याने अफगानिस्तान सोडलं आणि तो मुंबईत आला. त्याच्या गुन्हेगारी विश्वाची सुरूवात जुगारापासून झाली. तो त्याच्या भाड्याच्या घरात जुगाराचा अड्डा चालवत होता. जुगार खेळणारांना उधारीवर पैसे देत होता. जुगारानंतर त्याने दारु व्यवसायही सुरू केला. जुगार आणि दारूनंतर त्याने मुंबईच्या डॉक यॉर्डमध्ये तस्करीचे काम सुरू केलं. त्याच्या काळ्या धंद्याबद्दल पोलिसांनाही माहिती होती. पण असं म्हणतात की करीम लालामध्ये एक मोठी खुबी होती. ती म्हणजे, तो पोलिसांसोबत लवकर मैत्री करायचा. जेव्हा करीम लाला पुर्ण-मुंबईवर राज्य करायचा करीम लालाच्या पठान गॅंगने जुगार, दारूच्या अड्ड्यांसोबतच तस्करी आणि हफ्ता वसुलीच्या कामातून मुंबईभर आपलं जाळं पसरवलं होतं. 50 च्या दशकात त्याने सोने आणि हिऱ्याच्या तस्करीत प्रवेश केला. त्याचदरम्यान मुंबईत हाजी मस्तानचा देखील उदय झाला होता. हाजी मस्तान समुद्र किनाऱ्यांवर तस्करीचं काम करत होता. दोघांनी एकमेकांशी मैत्री केली. करीम लाला आणि हाजी मस्तानने मिळून संपूर्ण मुंबईवर राज्य केलं. करीम लालाचे राजकीय नेते आणि बॉलिवूडशी होते चांगले संबंध.. राजकीय नेते आणि बॉलीवूड तारकांशीही त्याचे चांगले संबंध होते. तो चित्रपट सृष्टीतील कलाकरांना अनेकदा खानपानाला बोलवायचा. खास करून ईदनिमित्त तो खास कार्यक्रम ठेवायचा. त्याच्या कार्यक्रमात मुंबईतील अनेक प्रसिद्ध व्यक्ती हजेरी लावत असत. असं सागितलं जातं की एकदा ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या सांगण्यावरून त्याने अभिनेत्री हेलेनची मदत केली होती. करीम लाला त्याच्या घरात प्रत्येक आठवड्याला दरबार भरवायचा आणि त्यामध्ये सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेवून त्यांच्या गॅंगच्या ताकदीच्या बळावर तो त्या लोकांना त्यांचे प्रश्न सोडवायला मदत करायचा. 80 च्या दशकात दाऊदच्या येण्याने सुरु झालं गॅंगवॉर 80 च्या दशकात गुन्हेगारी जगतात दाऊदचं नाव चर्चेत आलं. त्याच्या येण्याआधी इतर सर्व गॅगस्टर्समध्ये सोबतीने कामं चालत होती. मात्र दाऊदच्या येण्याने गॅंगवॉरला सुरुवात झाली. करीम लालाच्या गॅंगने 1981 मध्ये दाऊदचा भाऊ शब्बीर याची हत्या केली. त्यानंतर मुंबईतील रस्त्यांवर गॅंगवार सुरू झालं. दाऊदची गॅंग आणि करीम लालाची पठान गॅंग एकमेकांवर हल्ले करू लागले. 1986 मध्ये दाऊदच्या गॅंगने करीम लालाचा भाऊ रहीम खानची हत्या केली. कालातरांने करीम लालाची गॅंग कमजोर पडू लागली. दाऊदच्या गॅंगने मुंबईवर आपलं वर्चस्व निर्माण केलं. दाऊदच्या गॅंगचं वर्चस्व वाढल्यानंतर करीम लाला शांत झाला. वयाच्या 90 व्या वर्षी 19 फेब्रुवारी 2002 ला मुंबईमध्येच करीम लालाचा मृत्यू झाला.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Indira gandhi

    पुढील बातम्या