लता मंगेशकरांचं बनावट लेटरहेड वापरून रेवती खरेनं घातला लाखोंचा गंडा

लता मंगेशकरांचं बनावट लेटरहेड वापरून रेवती खरेनं घातला लाखोंचा गंडा

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची खोटी सही, शिक्का आणि लेटरहेडच्या साह्याने एका महिलेने अनेकांकडून पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रेवती खरे हिच्याविरोधात गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

  • Share this:

22 सप्टेंबर : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची खोटी सही, शिक्का आणि लेटरहेडच्या साह्याने एका महिलेने अनेकांकडून पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रेवती खरे हिच्याविरोधात गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लतादीदींच्या नावाच्या लेटरहेडच्या मदतीने रेवतीने अनेकांकडून पैसे उकळले.

सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. याबाबत दीदींना माहिती मिळाली. त्यानंतर लतादीदींच्या वतीने महेश राठोड यांनी गावदेवी पोलीस ठाण्यात खरेविरोधात तक्रार दाखल केली. लतादीदींना समाजात सर्वोच्च स्थान असल्याने त्यांच्या नावाने अनेक जण सामाजिक कार्यात मदतीसाठी पुढे येतात. रेवती खरे या महिलेने त्यांच्या नावाचा गैरवापर करत अनेकांना गंडा घातला आहे. तिने दीदींच्या नावाने बनावट निमंत्रण पत्रिका आणि लेटरहेड तयार केले होते. त्यावर विश्वास ठेवून अनेकांनी आर्थिक मदतही केली. पुस्तक प्रकाशन सोहळे आणि विविध कार्यक्रमांना आलेल्या नागरिकांना रेवती दीदींच्या नावाने तयार केलेल्या बनावट पत्रिका देत होती. आपण दीदींचे नाव पाहून आर्थिक मदत केल्याची माहिती एका व्यक्तीने दीदींनाच दिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

रेवती नालासोपारा येथे राहत असून तिचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताजी भोपाळे यांनी दिली. रेवतीला आर्थिक मदत देणाऱ्यांचे जबाबही नोंदवून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

First published: September 22, 2017, 1:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading