अणर्ब गोस्वामींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, अलिबाग कोर्टाचा निर्णय

अणर्ब गोस्वामींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, अलिबाग कोर्टाचा निर्णय

गोस्वामी यांना मुंबईतल्या त्यांच्या घरून अटक केल्यानंतर अलिबागला नेण्यात आलं होतं. तिथे त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.

  • Share this:

अलिबाग 04 नोव्हेंबर: रिपब्लिक टीव्हीचे संपादक (Republic TV editor ) अर्णब गोस्वामी (Arnab goswami) यांना अलिबाग कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला. गोस्वामी यांना अटक केल्यानंतर दुपारी अलिबागच्या कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर गोस्वामी यांनी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला. त्यानंतर कोर्टाने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितलं. नंतर पुन्हा संध्याकाळी त्यांना कोर्टात हजर करण्यात आली. जेष्ठ वकील आबाद फोंडा यांनी गोस्वामी यांच्यावतीने युक्तिवाद केला. गुरुवारी हायकोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

गोस्वामी यांच्या विरुद्ध अलिबाग नंतर मुंबई पोलिसांनीही  FIR दाखल केला आहे. पोलिसांचं पथक अर्णब गोस्वामी यांच्या घरी पोहोचल्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी कलम 353 नुसार अर्णब गोस्वामीवर केला गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचा-यांशी हुज्जत घालणे  असे आरोप करत  गुन्हा दाखल केला आहे.

आज सकाळी मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना राहत्या घरातून ताब्यात घेतले होतं. या प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांनी अलिबागजवळील कावीर इथं आपल्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या आई कुमुद नाईक यांचाही घरात मृतदेह आढळून आला होता.

या प्रकरणी गोस्वामी यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आज सकाळी मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.  अर्णब गोस्वामी यांना चौकशीसाठी अलिबागला नेलं आहे.

गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजपने राज्यात आंदोलन केलं होतं. ही अटक म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरचा हल्ला असल्याची टीका भाजपने केली होती. तर कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही सर्वांना सारखाच न्याय असल्याचं काँग्रेस आणि शिवसेनेने म्हटलं होतं.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 4, 2020, 11:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या