मुंबई, 25 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतून मोठी बातमी आली आहे. प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारीला देशाची आर्थिक राजधानी मुंबईत हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये ड्रोन हल्ल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर हा संपूर्ण परिसर नो फ्लाईंग झोन घोषित करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांनी मंगळवारी दादरचा शिवाजी पार्क परिसर 'नो-फ्लाय' झोन म्हणून घोषित केला. प्रजासत्ताक दिनाच्या मध्यरात्रीपासून (सकाळी 12) 24 तासांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले. हवाई हल्ल्याच्या संशयावरून 26 जानेवारीला हा आदेश जारी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबईत प्रजासत्ताक दिनी हवाई हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर अलर्ट मोडवर आलेल्या मुंबई पोलिसांनी शहराच्या सुरक्षेत वाढ केली आहे. हल्ल्याचा इशारा पाहता मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. येथे उद्यानाच्या प्रत्येक गेटवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. यासोबतच बुधवारपासून शिवाजी पार्कमध्ये सर्वसामान्यांचा प्रवेशही बंद करण्यात आला आहे.
वाचा - 'घरात शिट्टी वाजवण्याच्या कृत्याला लैंगिक छळ..' मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय
मंगळवारी जारी केलेल्या आदेशात, मुंबई पोलिसांचे डीसीपी ऑपरेशन्स, विशाल ठाकूर यांनी सांगितले की, "मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्क येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त परेड आणि सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान दहशतवादी किंवा असामाजिक तत्वे घुसू शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे. शांतता भंग करण्यासाठी हवाई वाहनांचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. यामुळे मानवी जीवन, सुरक्षा आणि सार्वजनिक मालमत्तेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कलम 144 लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. 'प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्कवर 26 जानेवारी 2023 रोजी होणारी औपचारिक परेड आणि सार्वजनिक कार्यक्रम पाहता, कोणत्याही व्यक्तीने शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्रोन किंवा उडणाऱ्या डिव्हाईसला परवानगी दिली जाणार नाही. हा प्रतिबंधात्मक आदेश 25 ते 26 जानेवारीच्या मध्यरात्री 12 ते 27 जानेवारीच्या मध्यरात्री 12 पर्यंत 24 तास लागू राहील, असे सांगण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Republic Day 2023