मुंबई, 15 जानेवारी : राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली होती. परंतु, राष्ट्रवादी पक्षाने धनंजय मुंडे यांची पाठराखण करत तुर्तास दिलासा दिला आहे. तर दुसरीकडे बलात्काराचा आरोप करणारी रेणू शर्मानेही यू-टर्न घेतला आहे. त्यानंतर आता दुपारी 3 वाजता रेणू शर्मा आपल्या वकिलांसोबत पत्रकार परिषद घेणार आहे.
रेणू शर्मा यांच्याकडून आज दुपारी 3 वाजता एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत रेणू शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी हे सुद्धा असणार आहे. आतापर्यंत जे काही आरोप करण्यात आले होते, या प्रकरणावर रेणू शर्मा बोलणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
त्यापूर्वी, भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी देखील रेणू शर्मावर हनी ट्रॅपचा आरोप केल्यानंतर तिने पुन्हा एकदा काही ट्वीट्स केले होते. भाजप नेते कृष्णा हेगडे (Krishna Hegde) यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या एका पत्रात रेणू शर्मा (Renu Sharma) नावाच्या महिलेवर ब्लॅकमेल करत असल्याचे आरोप केले आहेत.
त्यानंतर आता रेणू शर्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व जाणीवपूर्वक केल्याचं तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मी कोणत्याही हनी ट्रॅपचा भाग नव्हते, असेही तिने यावेळी स्पष्टीकरण दिलं. मनसे नेते मनिष धुरी यांनी देखील तिच्यावर आरोप केले आहेत. कृष्णा हेगडे यांनी असे म्हटले होते की, '2010 पासून ही महिला त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे धनंजय मुंडे यांना पाठिंबा देणाऱ्या गटाची बाजू अधिक मजबूत झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
रेणू शर्माने ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, 'कृष्णा हेगडे यांनीच माझ्याशी बोलायला सुरुवात केली होती. ते मला आमदार प्रताप सिंह सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटले होते. त्यांनी माझ्यावर जे काही आरोप लावले आहे, ते खोटे व बिनबुडाचे आहेत. धनंजय मुंडे यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला जात असून समाजात माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.'
तिने पुढे असं देखील म्हटलं आहे की, कृष्णा हेगडेंनी त्यांच्यावर केलेले आरोप खोटे आहेत. त्या पुढे असंही म्हणाल्या आहेत की तुमची हीच इच्छा असेल तर मी माघार घेते. तक्रारदार रेणू शर्माने असं म्हटलं आहे की, 'एक काम करा तुम्ही सर्वांनीच निर्णय घ्या, काहीही माहित नसूनही जे मला ओळखतात किंवा जे ओळखत नाहीत ते चुकीचा आरोप करत आहेत. तुम्ही सर्वांनी मिळून ठरवा, मी तुमची इच्छा आहे त्याप्रमाणे माघार घेते'.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.