मुंबई, 22 मुंबई : राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या गायक महिलेने धनंजय मुंडेंवर बलात्काराची तक्रार केली होती. ज्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले होते. त्याच तक्रारदार महिलेने आता यू-टर्न मारत आपली तक्रार मागे घेतली आहे. रेणू शर्माने (Renu Sharma) लेखी अर्ज देवून आपली तक्रार मागे घेतली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली आहे. पण पुन्हा ती तक्रार मागे घेण्यावरुन मागे फिरु नये म्हणजेच मी तक्रार मागे घेतली नाही असा दावा करू नये या करता पोलिसांनी तिला आपले म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे देण्यास पोलिसांनी सांगितले होते. त्यानुसार, रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली असे ते प्रतिज्ञापत्र तिने मुंबई पोलिसांना दिले आहे. एका वरीष्ठ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर या माहितीला दुजोरा दिला.
“मी केलेली तक्रार काही कारणास्तव मी मागे घेत आहे” असं प्रतिज्ञपत्र रेणू शर्मा हिने पोलिसांना दिले आहे. तर या प्रकरणातील रेणू शर्माचे वकील यांनी 3 दिवसांपूर्वीच काही खाजगी कारण सांगत रेणू शर्माची केस त्यांनी सोडली होती. त्यानंतर आता रेणू शर्मानेच तक्रार मागे घेतली त्यामुळे धनंजय मुंडेंना मोठा दिलासा मिळाला आहे. 15 जानेवारीला रेणू शर्माने ट्विट करुन आपण तक्रारार मागे घेत असल्याचे सागंतिले होते.
कोण आहे रेणू शर्मा?
महाराष्ट्र सरकारमधील धनंजय मुंडे या बड्या नेत्यावर आरोप करणाऱ्या रेणू अशोक शर्मा या बॉलिवूड गायिका आहेत. रेणू शर्मा यांनी दावा केला आहे की, 1997 मध्ये त्यांची आणि धनंजय मुंडेंची भेट झाली. तेव्हा त्या 16-17 वर्षांच्या होत्या. मध्यप्रदेशात त्यांच्या बहिणीच्या घरी त्यांची भेट झाली होती. 2006 मध्ये त्यांची बहिण इंदुरमध्ये असताना मुंडे यांनी इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप रेणू यांनी केला होता. बड्या निर्मात्याला भेटवण्याच्या आणि बॉलिवूडमध्ये लाँच करण्याच्या नावाखाली त्यांनी वारंवार शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप रेणू यांनी केला होता.
भाजप नेत्याचा रेणू शर्मावर हनी ट्रॅपचा आरोप
दरम्यान भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी देखील रेणू शर्मावर हनी ट्रॅपचा आरोप केल्यानंतर तिने पुन्हा एकदा काही ट्वीट्स केले होते. भाजप नेते कृष्णा हेगडे (Krishna Hegde) यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या एका पत्रात रेणू शर्मा (Renu Sharma) नावाच्या महिलेवर ब्लॅकमेल करत असल्याचे आरोप केले आहेत. या प्रकरणामुळेही चांगलीच खळबळ उडाली होती.
धनंजय मुंडेंनी फेटाळले सर्व आरोप
या सगळ्या आरोपांवर स्वत: धनंजय मुंडे यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो, असं मुंडे यांनी म्हटलं आहे. मात्र यावेळी त्यांनी बलात्काराचे आरोप खोडून काढले आहेत.
'2019 पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीविताला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता,' असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. हे संपूर्ण प्रकरण हे ब्लॅकमेलिंग करणारे, खोटे व बदनामी करण्याच्या हेतूने घडवून आणण्यात आले असून त्यामुळे यात अशा आरोपांवर विश्वास ठेवू नये, अशी विनंती धनंजय मुंडे यांनी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.