मुंबई 06 नोव्हेंबर: राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा विक्रमी वाढ झाली आहे. सलग 20 पेक्षा जास्त दिवसांपासून ही वाढ होत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी (6 नोव्हेंबर) तब्बल 11,060 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ही 15,62,342 एवढी झाली आहे.
तर दिवसभरात 5027 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 17,10,314 एवढी झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 161 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूचा आकडा हा 44,965वर गेला आहे. तर राज्यात सध्या 1,02,099 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईतही रुग्णांच्या दुपट्टीचा वेग हा 200 दिवसांवर गेल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
COVID-19 सगळ्या देशाचं लक्षं लागलेल्या मुंबईने कोरोनाच्या वेगाला रोखण्यात आता यश मिळवलं आहे. रुग्ण वाढीचा दर आता विक्रमी 200 दिवसांवर गेला आहे.
मुंबईतल्या 4 विभागात 300 पेक्षा अधिक तर 11 विभागात 200 पेक्षा अधिक दिवसांवर रुग्ण दुप्पटीचा कालावधी गेला आहे. रुग्ण वाढीचा सरासरी दर देखील आता 0.33 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. सतत केलेल्या उपाय योजनांमुळेच कोरोनाला रोखता आलं असं BMCने म्हटलं आहे.
मास्कचा नियमित उपयोग, हातांची वारंवार स्वच्छता राखणे व सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचे पालन प्रत्येक नागरिकाने करावे असं आवाहनही बीएमसीने केले आहे.
आता करा मज्जा! दिवाळीच्या सुट्टीत झाली मोठी वाढ, असं आहे नवं वेळापत्रक
रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी जितका जास्त तितका संक्रमणाचा वेग कमी असतो. 21 ऑक्टोबर रोजी रुग्ण दुप्पटीचा दर 100 दिवसांवर गेला होता. 29 ऑक्टोबरला 157 दिवसांचा टप्पा ओलांडला होता.
त्यानंतर अवघ्य 8 दिवसांत म्हणजे दिनांक 5 नोव्हेंबरला मुंबईचा रुग्ण दुप्पटीचा सरासरी कालावधी 51 दिवसांनी वाढून 208 दिवस इतका झाला आहे. तर मुंबईच्या 4 विभागांमध्ये या दराने 300 दिवसांचा टप्पा गाठला आहे.