रत्नागिरी 24 जानेवारी : रत्नगिरी जिल्ह्यातल्या सरकारी ग्रामीण रुग्णालयात नोकरी करणाऱ्या 88 डॉक्टरांना सहा महिने पगारच मिळालेला नसल्यामुळे या डॉक्टरांनी काम बंद करण्याचा इशारा दिलाय . सहा महिने पगार झाला नसल्यामुळे या डॉक्टरांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची झाली असून हे डॉक्टर प्रचंड मानसिक तणावाखाली काम करतायत . याबाबत डॉक्टरांच्या मॅग्मो संघटनेने 14 जानेवारीला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेटही घेतली मात्र सहा दिवस उलटूनही डॉक्टरांचे पगार झाले नसल्यामुळे वैद्यकीत सेवा देणार नसल्याचा इशारा या डॉक्टरानी दिलाय . त्यामुळे ग्रामीण आरोग्यव्यवस्था कोलमडण्याची भीती आहे.
काय आहे प्रकरण?
कोकणातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध्द होत नाहीत म्हणून शासनाने ADHOC धोरणानुसार कंत्राटी पध्दतीवर आवश्यकतेनुसार डॉक्ट्ऱांची भरती करण्याचे अधिकार जिल्हा पातळीवर दिले .यासाठी BAMS आणि MBBS डॉक्टरना 40 हजार ते 55 हजार पगार ठरवण्यात आला. एव्हढा कमी पगार असूनही नोकरीची गरज म्हणून राज्यातल्या नगर , धुळे , बुलडाणा , गडचिरोली भागातून रत्नागिरीत 88 डॉक्टर हजर झाले.
मात्र गेले सहा महिने या डॉक्टराना महिन्याला 40 हजाराचं तुटपुंज मानधनही देण्यात आलेले नाही. इतकच काय तर आधीपासून सेवा देणाऱ्या अनेक डॉक्टरांना त्यांचे देय असलेले आर्थिक लाभही सरकारने दिलेले नाहीत. त्यामुळे डॉक्टरांमध्ये संतापाचं वातावरण असून त्यानी काम बंद चा इशारा दिलाय. असं जर झालं तर कोकणातली ग्रामीण आरोग्य व्यवस्था पुर्णपणे कोलमडणार आहे. सध्या रत्नागिरीतल्या जिल्हा रुग्णालयातही डॉक्टरांची कमतरता आहे. गेल्या महिन्यात चार अस्थिरोग तज्ञानी जिल्हा रुग्णालयातली नोकरी सोडली आहे.
आरोग्यव्यवस्था कोलमडणार
कोकणात नोकरी करायला एकतर डॉक्टर तयार होत नाहीत . कोकणातल्या अनेक प्राथमिक आरोग्यकेद्रात या डॉक्टराना गरजेनुसार 24 तास सेवा द्यावी लागते. त्यात गावपुढाऱ्यांच्या नाहक त्रासाला या डॉक्टराना सामोरे जावे लागते. अनेकवेळा ग्रामीण भागात काम करणाऱ्या डॉक्टरांवर पेशंटच्या नातेवाईकानी हल्ले केले आहेत.
अशा परिस्थितही काही डॉक्टर आपली सेवा देत आहेत. पण सहा सहा महिने पगार नसतील तर आम्ही खायचं काय? आम्ही काय वेठबिगार आहोत का! असा संतप्त सवाल हे डॉक्टर विचारतायत . आणि त्यामुळे या डॉक्टरानी अखेर काम बंदचा इशारा दिलाय . जर डॉक्टरसंपात उतरले तर मात्र ग्रामीण आरोग्यसेवा पूर्णपणे कोलमडणार आहे .
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.