रत्नागिरी, 13 जून : रत्नागिरी जिल्ह्यात आज सायंकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड, संगमेश्वर, राजापूर या भागात जोरदार पावसाला सुरुवात केली आहे. जिल्ह्यासाठी 14 व 15 जून रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील बहुतांश सर्वच तालुक्यात पावसाला सुरुवात झाली असून पुढील दोन दिवस धोक्याचे आहेत. हवामान विभागाने जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला अति मुसळधार पावसाचा इशारा दिलेला असताना आणि दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना जिल्ह्यात कलम 144 प्रमाणे जमावबंदी लागू आहे. मात्र असे असताना शेकडो पर्यटकांनी आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील रघुवीर घाटात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी मोठी गर्दी केली होती. खेडमधील रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा कोयना अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात असलेला हा घाट प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आहे. मात्र नऊ दिवसांचा कडक लॉकडाऊन संपल्यानंतर आणि गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे या घाटात धबधबे चांगलेच प्रवाहित झाले आहेत. आज या घाटात शेकडो पर्यटक त्या ठिकाणी गेले होते. संध्याकाळी उशिरा खेड पोलिसांनी या रघुवीर घाटात जाऊन सर्व पर्यटकांना हटकले आणि पुन्हा पाठवले. जिल्ह्यात जमावबंदी असताना खेडमधील रघुवीर घाटात झालेली ही मोठी गर्दी कोरोना संक्रमण आणि अतिवृष्टीच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरली आहे.
हे ही वाचा-Weather Update: मुंबईत पावसाची विश्रांती; विदर्भातील या जिल्ह्यांत कोसळणार सरी
रत्नागिरी जिल्ह्यात 31 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्याला अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नदी किनारी कोणीही विनाकारण न जाण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलेले असताना आज मासे पकडण्यासाठी नदीत गेलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील खोपी गावातील 31 वर्षीय इसमाचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. महेश वसंत निकम असे नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. रविवारी खेड पोलिसांनी याची आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.