Home /News /mumbai /

रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचं निधन

रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचं निधन

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज उपचारादरम्यान क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

    मुंबई, 15 जून :  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि  सामनाच्या संपादक रश्मी उद्धव ठाकरे यांचे वडील माधव गोविंद पाटणकर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.  ते 78 वर्षांचे होते.  मुंबईत अंधेरी येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार  सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रश्मी ठाकरे यांचे वडील  माधव पाटणकर यांची प्रकृती काही दिवसांपासून अस्वस्थ होती. त्यामुळे त्यांना मुंबईतील अंधेरी येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.  आज उपचारादरम्यान क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माधव पाटणकर यांच्या निधनाबाबत तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करून पाटणकर व ठाकरे कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, अशी भावना व्यक्त केली. राज्यपालांनी लिहिले सांत्वन पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रश्मी  ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचे निधन झाल्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. याबद्दल त्यांनी सांत्वन करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. ठाकरे आणि पाटणकर कुटुंबाच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे त्यांनी पत्रात कळवलं आहे. अजित पवार यांची श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे आणि दैनिक 'सामना'च्या संपादक  रश्मीताई ठाकरे यांचे वडील, उद्योजक माधवराव पाटणकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.  रश्मीताईंना पितृवियोगाचे दुःख सहन करण्याचे बळ मिळो. पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ठाकरे आणि पाटणकर कुटुंबियांच्या दुःखात सामील आहेत, असेही उपमुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या