रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशावेळी 'शरद पवार' म्हणतात...'सर्व पाहुण्यांचे स्वागत'

रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशावेळी 'शरद पवार' म्हणतात...'सर्व पाहुण्यांचे स्वागत'

रणजितसिंह मोहिते-पाटीलांच्या भाजप प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा एक बोर्ड मोठा चर्चेचा विषय ठरला.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई, 20 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पण या प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा एक बोर्ड मोठा चर्चेचा विषय ठरला.

रणजितसिंह मोहिते पाटील यांचा भाजप प्रवेश हा वानखेडे स्टेडियमवरील गरवारे क्लब या ठिकाणी झाला. या क्लबचे अध्यक्ष हे शरद पवार आहेत. त्यामुळे साहजिकच प्रवेशद्वारावर शरद पवार यांच्या नावाचा बोर्ड लावण्यात आला आहे. या बोर्डवर लिहिलं होतं की, 'अध्यक्ष शरद पवार सर्व पाहुण्यांचं स्वागत करत आहेत.'

दरम्यान, रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रणजितसिंह यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीला माढ्यात मोठा धक्का बसला आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजप प्रवेशाची घोषणा केली होती. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भरभरून कौतुक केलं. त्याचवेळी रणजितसिंह यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं. तर रणजितने केलेल्या घोषणेला माझी सहमती आहे, असं विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले.

राष्ट्रवादीचे नेते रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा गेली अनेक दिवस होती. मात्र या प्रवेशावर अंतिम मोहोर उमटली ती मंगळवारी 19 मार्च रोजी झालेल्या मोहिते पाटीलांच्या कार्यकर्ता मेळाव्यात.

रणजितसिंह माढ्यातून भाजपचे उमेदवार?

रणजितसिंह मोहिते-पाटील हे भाजपकडून माढ्यातील उमेदवार असणार आहेत, अशी माहिती आहे. माढ्यातून रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी विरोध केला होता. त्यामुळे आता रणजित सिंह मोहिते- पाटील यांनी भाजप प्रवेश केला आहे.

लोकसभा 2019 च्या आखाड्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि राजकारणातल्या 'चाणक्य नीती'साठी ओळखले जाणारे शरद पवार उतरले होते. पण आता पवारांनी आपली भूमिका बदलत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असं म्हटलं आहे.


VIDEO : रणजित तर आले विजयसिंह मोहितेंचं काय? मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2019 03:12 PM IST

ताज्या बातम्या