खास मालवणी ब्लॉग : ' राणेंची देवाक काळजी '

खास मालवणी ब्लॉग : ' राणेंची देवाक काळजी '

तळकोकणात सध्या नारायण राणेंच्या बहुचर्चित भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. नाक्या नाक्यावर फक्त राणेंच्याच भाजप प्रवेशाच्या गजाली झोडल्या जाताहेत. म्हणूनच आयबीएन लोकमतचे कोकणचे विशेष प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी खास मालवणी भाषेत राणेंच्या राजकीय कारकिर्दीवर लिहिलेला हा विशेष ब्लॉग...

  • Share this:

दिनेश केळुसकर, कोकणचे विशेष प्रतिनिधी

' राण्यांची रग '

पावळेक पावळी टेकान हुती, घराक घर लागान हुता

पोरान-टॉर, ल्हान-थॉर, याकच खळा भरा हुता.

घरचो आकार, मूळ पुरुष, बारा-पाच राजी हुते

दुतड-पांडर येक होवन् येका मतार नांदा हुते.

अवाट सगळो येक हुतो, मानका-यांका मान हुतो,

घरटीपी येक नारळ गावच्या होळयेक जायत हुतो.

कदी कोनार परसंग येय..हुंब-यान हुंबरो जागो होय,

'आमी आसव भिया नुको' शब्दान मानूस बरा होय.

आता घरा फुटत चलली, मानसा मानसा तुटत चलली

आकडेत कोयतो - हवना नाय, मानेर घालूक धावत सुटली.

जांटी सगळी बाजूक पडली, शेंबडी पोरा दादा झाली,

आवशीक इसरान बापाशीकव फाट्यार मारुन मोकळी झाली.

दारा-दारार झेंडे लागले..चुलीर पक्ष शिजाक लागले,

चाकरमानी त्याच आगीत आनीक त्याल वतूक लागले

गॅन्की-गॅन्की तयार झाल्ये..खिशा-खिशाक चाकू लागले,

पाषाणाचे 'कवूल' सुदा धमकेक भियान उजये झाले..

गाव..गाव -हवलो नाय...घरान घर सुटा झाला,

नदीर साकव झाले कितीव..मानसाक मानूस लांssब झाला..

आमच्यासारक्या म्हातार्ड्यांची केवाच लाकडा मसनात गेली,

पन बोलल्याशिवाय - हववत नाय...म्हनून तुमका साद घातली..

ही कविता मी सादारन अठरा वर्षांपुर्वी लिवलय. म्हंजे नव्याण्णव साली. शिरीची म्हंजे युवक कॉन्ग्रेस अध्यक्ष श्रीधर नाईकांची मर्डर होवन आठ वर्षा झाल्ली हुती. राज्यात युतीचा सरकार इल्ला हुता .! शिंदुर्गान कात टाकूक सुरुवात केल्ली हुती. वाडीवाडीत रस्ते बांदले जायत हुते, बारिक सारिक पुला होय हुती. खय खय साकव होयत हुते. तलाट्याची पायरी चडाक भिनारो मानूस कलेक्टर हाफिसात कामा घेवन जावक लागलो हुतो.. नळयोजनांची कामा सुरू होयत हुती.. असा सगळा होयत आसताना दुसरीकडे घराघरात राजकारण शिजत हुता.. शिकान सवरान नोकऱ्यो - धंदे नसणारी तरणीबांड पोरा शिवसेनेचो झेंडो हातात धरून पक्षात सामील होयत हुती.. तेंच्यातली काय काय कांट्रॅकटर होयत हुती. मुंबयतल्या ग्रामविकास मंडळांची तेंका साथ मिळत होती. गावागावात सेनेच्यो शाखा सुरू झालेल्यो होत्यो. पन दुसरीकडे राजकारन डोक्यात गेल्ली भावकी भावकीच येकामेकांच्यो मान्यो तोडूक धावत हुती. गावात येकेका भजन मंडळाची तीन तीन भजनी मंडळा होयत हुती. गावच्या मानकऱ्यात भांडणा सुरु झाल्ली होती. शिमग्यात राजकारणावरसून वाद होयत हुते. कणकवली कदीपन भडकत होती.. शिवसेना नावाच्या बुलडोजराखाली उरले सुरले समाजवादी आनी कांन्ग्रेस वाले शाप चिरडान जायत हुते.

नाथ पैं चो सिंधुदुर्ग, नारायण राण्यांचो शिंदुर्ग झालेलो हुतो. शिंदुर्गाची जिल्ला परिषद पयल्यांदाच शिवसेनेची म्हंजे राणे सायबांची झालेली हुती. महसूल मंत्री आसलेले राणे सायब मुख्यमंत्री झालेले हुते. राण्यांबद्दल खयच्या दुकानात, हाटेलात, कोनाच्या पान टपरेर, कोनाच्या सलुनात नायतर येष्टी स्टॅंडारसुदा बोलाची कोनाची हिम्मत नाय हुती. राण्यांचो इषय कोनी काडल्यान काय" नको बाबा, आमी काय बोल्लव तर आमचा नाव तेंच्यापर्यात जायत" असा म्हनान आयक्नारो मानूस थयसून काडतो पाय घेयत हुतो... काळ्या काचींच्या साठ - सत्तर गाडयेंचो तेंचो ताफो जेवा कनकवलेतसून जाय तेवा सगळी मानसा लांब रवान बगीत आसायची. श्रीधर नाईकांची मर्डर झाल्यानंतर शिवसेना संपली म्हनन्याऱ्यांच्या डोळ्यासमोरच शिवसेनेचा झाड भराभर वाडत हुता. आता ह्या झाडाक जी फळा धरली तेतूरली काय काय जहाल विषारी हुती ह्या फुडे नंतर लोकांका समाजला. पन तोपर्यात नारायण राणे नावाचो झंझावात अक्क्या म्हाराष्ट्रात पोचलेलो होतो .

ह्या सगळा आता आठावला हेचा कारण म्हंजे राणे सायबांच्या भाजपातल्या प्रवेशाची सद्या सुरू आसलेली गजाल. तशी ही गजाल गेल्या सा म्हयन्यांपासून शिंदुर्गात सुरु आसा. जातीत की नाय ? नक्की जातीत ? गेले तर कदी जातीत ? गेले तर तेंका काय मिळात ? तेंच्याबरोबर तेंचे सगळे कार्यकर्ते जातीत काय थोडे जातीत ? रवलेल्यांचा काय होयत ? बीजेपीतल्या प्रमोद जठारांका मग काय मिळात ? राजन तेली, संदेश पारकर, काका कुडाळकर ह्या तिगांचा काय होयत ? शिंदुर्गातल्या आताच्या शिवशेनेक फायदो जायत काय तोटो होयत ? बीजेपीक राण्यांची गरज आसा काय राण्यांका बीजेपीची ? बीजेपीक राज्यात राण्यांचो काय उपयोग होयत ? बीजेपी फक्त राण्यांकाच घेवक तयार आसा काय तेंच्या दोनय झिलांका पन ? तसा झाला तर मोट्याक काय देतीत ? धाकट्याक काय मिळात ? आता आनी खयचो पक्ष रवलो ? राणे सरकारात इले आणि मंत्री झाले तर केसरकरांचा काय ? की केसरकर सुदा भाजपाच्याच वाटेर आसत ? अश्यो आनी अश्यो शंबर गजाली सद्या शिंदुर्गात जय ठय सुरु आसत. ज्या शिंदुर्गात राणे सायबांबध्दल तोंडातसून सबूद काडूक भियत मानसा त्याच शिंदुर्गात आता कोनय मानूस राण्यांबध्दल आपला मत मांडताहा .चर्चा ही होतलीच कारन राणे सायब सामान्य मानूस नाय. म्हाराष्ट्राचो मुख्यमंत्री , मंत्री, विरोधी पक्षनेतो अशी म्हत्वाची खाती जेंका मिळाली अशा व्यक्तीक दोन पक्ष बदलून तिसऱ्या पक्षात जावची येळ येता म्हनून ही चर्चा सुरू आसा.

पन बीजेपीत जान्याची तेंच्यार येळ कित्याक इली ? ह्या प्रश्नाचा उत्तर मुळात बारा वर्षापुर्वी तेंच्यानी शिवसेना कशाक सोडली हेतूर दडलेला आसा. नव्याण्णवात युतीची सत्ता गेल्यानंतर परत सत्ता येवन शिवसेनेचोच मुख्यमंत्री होयत असा काय कोनाक वाटा नाय हुता. आनी ता खरा हुता .म्हनान तेंच्यानी सेना सोडल्यानी. पन सेना सोडताना आपण स्वत: हून सेना सोडली असा न वाटता सेनेन आपनाक काडून टाकूक व्हया अशी राजकीय खेळी तेनी केल्यानी त्यापरमान सेनेतसून तेंका बाळासायबानी काडून टाकल्यानी. बगा.. शिवसेनेसाटी मी रक्ताचा पानी केलय आनी माकाच काडून टाकल्यानी. असा सांगाक राण्यानी सुरुवात केल्यानी ." राणे साहेब अंगार है , बाकी सब भंगार है " अश्यो घोषणा शिंदुर्गात सुरू झाल्यो. मग चर्चा सुरू झाली ती शिवसेना सोडल्यार ते खयच्या पक्षात जातीत हेची. खरा म्हनशात रर तेंका जावचा होता राष्ट्रवादीत. पन ता गनित काय जमाक नाय . आता ह्या गनित का जमाक नाय ता शरद पवारांकाच ठावक ! अकेरशेवटाक मार्गारेट अल्वा आनी प्रभा राव हेंच्या माद्यमातून शिंदुर्गातल्या शिवसेनेची अख्खी कोंड घेवन ते कान्ग्रेसात पोचले. झडप घालून भक्ष पकडणाऱ्या वाघाच्या डोक्यार अहिंसेची गांधी टोपी चडली !

मग लागली मालवनची पोटनिवडनूक ! सेनेतलो येकेकाळचो तेंचो उजवो हात आसलेलो जिजी उपरकर मालवनात तेंच्या इरोदात उबो रवलो. नारायण राणे विरुध्द राज्यातली अक्की शिवसेना असा युध्द मालवनात झाला. पत्रकार म्हनान माका ह्या युध्द अगदी जवळसून बगूक गावला. ह्या युध्दाबध्दल लिवचा म्हंजे अक्क्या पुस्तक होयत ! खुद्द बाळासायबानी मालवनात येवन सभा घेतल्यानी ! तरीसुदा जिजीचा डिपॉजीट गेला. आनी 16 आगस्ट 2005 ला राणे सायब कॉन्ग्रेस सरकार मधले महसूल मंत्री झाले. मुक्यमंत्री हुते विलासराव देशमुख सायब ! आमदारांचो सपोर्ट मिळवलात तर लवकरच तुमका मुक्यमंत्री करू असो शब्दव तेंका कॉन्ग्रेस श्रेष्ठींकडून दिलो गेलो. राण्यांसारको म्हत्वाकांक्षी नेतो मग गप थोडोच रवात ? तेंच्यनी सेनेतल्या आपल्या समर्थक आमदारांका फोडूक सुरुवात केल्यानी. तेंच्यापैकी पाच - सा जनांका पयल्या फटक्यात निवडूनव आणल्यानी. त्यामुळा कॉन्ग्रेसमदला राणे सायबांचा वजन वाडला ! पन त्याच येळाक म्हाराष्ट्राच्या कॉन्ग्रेस पक्षातले तेंचे इरोधकय वाढले.

तेतूरच मुंबयवरच्या अतिरेकी हल्ल्यानंतर 2008 च्या नोवेंबर म्हयन्यात 30 तारकेक मुक्यमंत्री विलासराव देशमुख आपलो झील रितेश आणि हिंदी पिक्चराचो डायरेक्टर राम गोपाल वर्मा हेंका घेवन ताज हाटेलची पाहणी करूक गेले आनी कर्मात गावले .! विलासरावांका राजीनामो देवचो लागलो. प्रश्न इलो, आता मुक्यमंत्री कोन ? साजिकच राणे सायबानी फिल्डिंग लावक सुरुवात केल्यानी. पक्षाचे वरीष्ठ निरिक्षक इले. आमदारांची मता घेतल्यानी. तेतूर सगळ्यात जास्ती आमदारानी राण्यांच्या बाजून कौल दिल्यानी . ह्या लक्षात इल्यार विलासरावानी आपली सुत्रा फिरवल्यानी. आनी हाय कमांडबरोबर बोलान अशोक चव्हाणांका मुक्यमंत्री केल्यानी . राण्यांच्या तोंडातलो घास काडून घेतलो गेलो ! राणे खवाळले ! कनकवलेच्या विद्यामंदीर ग्राउंडार येवन तेंच्यानी जाहीर सभा घेतल्यानी. विलासरावांचो हात रक्ताळलेलो हात अशी पोष्टरा लावल्यानी ! आनी थयच येक घोषणा केल्यानी. " एक तर मी तरी संपेन नाहीतर कॉन्ग्रेसला तरी संपवेन!" .. झा ss ला .. राण्यांचो ह्यो संताप तेंका भारी पडलो ! कॉन्ग्रेस मदसून तेंका काडून टाकूचे असो आग्रह कॉन्ग्रेस मधल्या नेत्यानी धरलो ! पन राण्यांका काडून टाकूक नाय. थोड्या दिवसांसाटी तेंचा निलंबन झाला ! पन थयसून कॉन्ग्रेसच्या नेतृत्वावरचो राण्यांचो इश्वास उडालो . आनी कॉन्ग्रेस म्हणजे शिवसेना नाय ह्या तेंका कळान चुकला !

राणे कॉन्ग्रेसात होते पन कॉन्ग्रेसचे नाराज नेते अशी तेंची वळक झाली. मग जेवा जेवा संदी गावात तेवा तेवा पत्रकार तेंका तेंच्या मुक्यमंत्री होण्याच्या इच्चेबध्दल इचारूक लागले . तेवा तेवा ते नो कॉमेंट्स म्हणाक लागले . राणे सायबांका तेंच्याच शिंदुर्गात पयलो तडाको बसलो तो 2009 च्या विधानसबा निवडणुकेत. राण्यांचे कट्टर समर्थक रवी फाटक हेंका भाजपाच्या प्रमोद जटारांकडसून फक्त 34 मतानी पराभव पत्करुचो लागलो. आनी राण्यानी आतापर्यत राखलेली कणकवली भाजपाकडसुन खालसा झाली. ह्या निवडणुकेक राण्यानी आपली सगळी ताकद पणाक लावलेली होती. पण रवी फाटक हरले. फाटक हरले म्हणजे राणे हरले अशीच चर्चा जय ठय सुरू झाली. त्यामुळा राण्यांचा कॉन्ग्रेसमदला वजन कमी झाला. दरम्यान सुरेश प्रभूंसारख्या गोड्या पन हुशार नेत्याचो लोकसभेक पराभव करून राणेंचे थोरले चिरंजीव निलेश कॉन्ग्रेसचे खासदार झालेले आसले तरी मुख्यमंत्री होवची राण्यांची इच्छा मार्गी लागात अशी चिन्हा काय दिसा नाय हुती. त्यामुळा तेंच्यानी स्वभावात नसताना सुदा कॉन्ग्रेसात जुळवन घेवचा ठरवल्यानी. थकडे तेंच्या धाकट्या चिरंजीवान म्हणजे नितेश राण्यानी कॉग्रेसात आसताना सुदा आपली स्वतंत्र स्वाभिमान संघटना काडून आपला येगळा बस्तान बसवक सुरुवात केल्ली हुती. त्यामुळे सुदा कान्ग्रेसचे वरचे नेते तेंच्यार नाराज हुते .

नंतर अशोक चव्हाणच आदर्श सोसायटीच्या झंगटात अडाकले आनी तेंच्या जाग्यार पृथ्वीराज चव्हाण इले . राण्यांका मंत्रीमंडळात स्थान मिळाला. तेंच्यार जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाचो इरोद मोडून काडूची जबाबदारी पृथ्वीराजानी सोपवल्यानी. राणे जैतापूरच्या विरोधकांवर तुटान पडले. हेचो फटको मात्र तेंचे थोरले चिरंजीव निलेश राणेंका 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बसलो. निलेश राणेंका पराभूत करून प्रचंड मतानी शिवसेनेचे विनायक राउत निवडान इले ! खुद्द शिंदुर्गात सुध्दा निलेश राणेंका व्हयी तशी मता मिळाक नाय. राण्यानी आपल्या मंत्रीपदाचो राजीनामो दिलो. ज्या शिवसेनेक राणे सायबानी शिंदुर्गात नामशेष केल्ल्यानी तीच शिवसेना परत फोफावत हुती. मग नितेश राणेनी म्हणजे तेंच्या धाकट्या सुपुत्रानी आपल्या भावाशीच्या पराभवाक शिंदुर्गातल्या विश्वासू शिलेदारांकाच जबाबदार धरल्यानी! तेतूर राजन तेली, काका कुडाळकर तेंका सोडून गेले. मग 2014 ची विधानसभा निवडणूक इली. राष्ट्रवादीतसून शिवसेनेत इलेले राणेंचे इरोधक दीपक केसरकरानी तर राण्यांविरोधात अक्क्या जिल्ह्यात रान उठवल्यानी ! केसरकर तर सेनेच्या तिकिटार सावंतवाडीतसून निवडान इले. आणि स्वत : राणे मात्र श्रीधर नाईकांच्या पुतण्याकडसून धा हजार मतानी तेंच्याच मालवणात हरले! राण्यांच्या 24 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीक शिंदुर्गातल्याच मतदारानी सुरुंग लावल्यानी. राजकारणातसून राणे बाद असा वाटत आसताना कणकवलेत मात्र भाजपाच्या प्रमोद जटारानी माती खाल्यानी ! नितेश राण्यांकडसून प्रमोद जटारांका 25 हजार मतांच्या नामुष्कीचो पराभव पत्करूचो लागलो. स्वत: हरल्यानंतर पत्रकारांका बोलताना राणे म्हनाले, " ह्या निवडणुकीत माझा अस्त झाला असला तरी नितेश राणे यांचा उदय होत आहे" पण तोपर्यात चित्र बदाललेला हुता. दिल्लीत नरेंद्र आनी म्हाराष्ट्रात देवेंद्र असा झाला. कॉन्ग्रेस आणि राष्ट्रवादीचा पानीपत झाला. मग कॉन्ग्रेसान राणे सायबांका वांद्र्यातसून तिकिट दिल्यान. थयव ते पडले. आनी येकेकाळी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आसणाऱ्या ह्या नेत्याक शेवटी विधानपरिषदेच्या आमदारकीवर समादान मानूचा लागला. राणेंची सेनेत जेवडी कोंडी झाली नाय इतकी कोंडी कॉन्ग्रेसात झाली .

जबरदस्त आत्मविश्वास, एक घाव दोन तुकडे असो स्वभाव. परिणामांची पर्वा नाय, राजकारणात कोन गॉडफादर नाय, आंगार इलेल्याक शिंगार घेवची सवय , अशा स्वभावाच्या नारायण राणेंचा राजकीय जीवन अनेक आशिर्वाद आनी तितक्याच शापांनी भरलेला आसा ! श्रीधर नाईक हत्या, सत्यविजय भिसे हत्या, रमेश गोवेकर बेपत्ता प्रकरण, अंकुश राणे हत्या अशा घटनांशी तेंचा नाव जोडला गेला. पन हेतूरलो येकव आरोप तेंच्यार सिध्द झालो नायं. तेंच्या संपर्कात इलेल्या अनेक शेळकुंडांची हळकुंडा झाली आनी काय काय हळकुंडांच्या नशीबात शेळकुंडांचा जगना इला ! आता हेच राणे बीजेपीत चल्लेहत असा समाजता. म्हणजे फक्त शरीर बदलत जाताहा ! आत्मो तोच ! पन खरा सांगाचा तर राण्यांसमोर तेंच्या दोन झिलांच्या राजकीय करिअरचो प्रश्न आसा. कारन कॉन्ग्रेस काय परत इतक्यात सतेत येत असा काय वाटना नाय हा. त्याकारनान भाजपाच्या कमळाचो आदार आसलेलो बरो ! आनी दुसरीकडे शिवसेनेक डायरेक आंगार घेनारो मानूस भाजपाक व्हयोच होतो. तेतूरसून तेंच्यानी आपल्या सोबत कॉन्ग्रेसचे आमदार आनल्यानी तर भाजपाक व्हयाच आसा ! आता बगुचा लागात की राणे सायब म्हाराष्ट्रात रवतत काय दिल्लीत येखादी जबाबदारी तेंच्यार सोपवली जाताहा ता ! बाळासाहेब ठाकरे ते अमित शहा व्हाया सोनिया गांधी ह्यो राणें सायबांचो राजकिय प्रवास मात्र विलक्षण आसा ह्या तितक्याच खरां !

First published: August 23, 2017, 6:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading