स्वाती लोखंडे, प्रतिनिधी
मुंबई, 15 जानेवारी : बेस्ट बस कर्मचाऱ्यांच्या संपावर आज आठव्या दिवशीही कोणताही तोडगा निघाला नाही. याबाबत आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिली आहे.
या पत्रातून राज ठाकरे यांनी उद्या होणाऱ्या उच्च समितीच्या बैठकीत मनसेला आपली बाजू मांडण्याची परवानगी मागितली आहे. मनसेकडून संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे प्रतिनिधित्व करतील असंही या पत्रात म्हटलं आहे.
'बेस्ट बस कर्मचाऱ्यांचा संप हा ज्वलंत विषय असून यामध्ये कामगार तसंच मुंबईकर दोघेही अत्यंत त्रस्त झाले आहे. यातील विद्युत विभागातील कामगार हे आमच्या संघटनेचे सभासद आहे. तसंच इतर कामगार आणि त्यांच्या कुटुंबीय यांनी माझ्यावर विश्वास टाकून त्यांच्या न्याय आपल्यासमोर मांडाव्यात आणि त्याला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली आहे, त्यामुळे या बैठकीत मनसेकडून बाजू मांडू द्यावी', अशी विनंती राज ठाकरेंनी केली आहे.
दरम्यान, मुंबई हायकोर्टाने बेस्टच्या कर्मचारी संघटनेला संप मागे घेण्याचे आदेश दिले आहे. परंतु, संघटना अजूनही संपावर ठाम आहे. बेस्टबाबत स्थापन केलेल्या समितीचा अहवाल आज कोर्टात मांडण्यात आला. मागण्यांची कालबद्ध पद्धतीनं पूर्तता करता येईल, पण आधी संप मागे घ्यावा, असं मुंबई हायकोर्टानं म्हटलं होतं. गेल्या दीड वर्षात अर्थसंकल्प विलिनीकरणाचा प्रस्ताव मनपा आयुक्तांनी सरकारकडे का पाठवला नाही, असा खडा सवालही कोर्टानं विचारला.
यावर महापालिकेनं उत्तर दिलं की, 'आम्ही अनेक प्रस्ताव सरकारकडे पाठवतो, पण प्रत्येक प्रस्तावाकडे राज्य सरकार लक्ष देईलच असं नाही.' असं म्हणत महापालिकेनं सरकारवर जबाबदारी ढकलली.
कामगारांनी तडजोडीसाठी तयार होऊन संप मागे घ्यावा अन्यथा सरकार कारवाई करेल, असं अहवालात म्हटलं आहे. कामगारांच्या सर्व मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार केला जाईल, असंही अहवालात नमूद करण्यात आले आहे. समितीच्या अहवालाचे मुद्दे कोर्टाने कामगार संघटनांच्या वकिलांना वाचायला दिले आहेत. तर कामगार संघटनांनी आज 6 वाजेपर्यंत संप मागे घेण्याचा निर्णय घ्यावा अशी विनंती मनपा आणि बेस्ट प्रशासनाने केली आहे. तर संप मागे घेण्याचा निर्णय तुम्ही आज घ्या आणि आम्हाला अधिकृतरित्या उद्या कळवला तरी चालेल अशी सुचनाही हायकोर्टाने कामगार संघटनांना केली आहे.
==================================