आता कळलं का? राज ठाकरेंनी उत्तरभारतीयांना सुनावलं

आता कळलं का? राज ठाकरेंनी उत्तरभारतीयांना सुनावलं

जर इथं येऊन गुन्हे करणार असाल, आमच्या माता भगणींवर हात उचलणार असला तर ते मुळीच खपवून घेणार नाही अशा शब्दात राज ठाकरे यांनी उत्तरभारतीयांना ठणकावूनही सांगितलं.

  • Share this:

मुंबई, 02 डिसेंबर : तुम्ही सगळ्या राज्यात जाऊन तुम्ही अपमानित होतात, मार खातात, अत्याचार सहन करतात, तुम्हाला काही  स्वाभिमान आहे की नाही? तुम्ही तुमच्या राज्यातील सत्ताधाऱ्यांना याचा जाब का विचारत नाही ? असा सवाल करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तरभारतीयांच्या व्यासपीठावर आपली सडेतोड भूमिका मांडली. जर इथं येऊन गुन्हे करणार असाल, आमच्या माता भगणींवर हात उचलणार असला तर ते मुळीच खपवून घेणार नाही अशा शब्दात राज ठाकरे यांनी उत्तरभारतीयांना ठणकावूनही सांगितलं.

मुंबईतील कांदिवली इथं उत्तरभारतीयांच्या महापंचायत कार्यक्रमात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी उत्तरभारतीयांना चार खडे बोल सुनावले. राज ठाकरे यांनी हिंदीतून भाषण करणार असल्याचं आधीच जाहीर केलं होतं. भाषणाच्या सुरुवातीलच राज ठाकरे यांनी याआधी मी गुजराथी आणि जैन समुदायाच्या कार्यक्रमात भाषण केलं ते मराठीत केलं होतं, कारण त्यांना ते समजत होते...पण मला दुबे यांनी सांगितलं की, माझं भाषण हे उत्तरप्रदेशमध्येही दाखवणार आहोत. म्हणून हिंदीत भाषण करतोय असं स्पष्ट केलं.

'तुम्ही तुमच्या सत्ताधाऱ्यांना का विचारत नाही'

देशात कुठेही जाऊन नोकरी करता येते राहता येते असं सांगितलं जाते पण यासाठी काही कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतात. त्या इथं कुणीही करत नाही.  तुम्ही इतर राज्यात जातात, मार खातात, संघर्ष करतात, अत्याचार सहन करतात. तुम्हाला काही स्वाभिमान आहे की नाही? तुम्ही तुमच्या सत्ताधाऱ्यांना जाब का विचारत नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी उत्तरभारतीयांना विचारला.

'...म्हणून रेल्वेभरती दरम्यान आंदोलन केलं'

आम्ही जेव्हा रेल्वे भरतीत आलेल्या तरुणांना मारहाण केली तेव्हा अनेकांनी आम्हाला प्रश्न विचारले. पण तेव्हा रेल्वे भरतीची जी काही जाहिरात असते तरी उत्तरप्रदेशमधील दैनिकांमध्ये देण्यात आली होती. त्यामुळे आमच्या मराठी मुलांना याबद्दल काहीही माहिती नव्हतं. जेव्हा आम्ही एवढ्या संख्येनं येणाऱ्या उत्तरभारतीय तरुणांना विचारलं तर तेव्हा त्यांनी जशी भाषा वापरली त्यामुळे संघर्ष निर्माण झाला. जर आमची मुलं उत्तरप्रदेशमध्ये आली असती तर त्यांनी अशी भाषा वापरली असती तर तुम्ही काय केलं असतं?असा थेट सवाल राज ठाकरेंनी विचारला.

तुमच्या नेत्यांमुळे वातावरण तापलं

फेरीवाल्यांना जेव्हा आम्ही मारहाण केली तेव्हा उत्तरभारतीय नेत्यांनी जी भाषा वापरली त्यातून संघर्ष झाला. मुळात तुमच्या काही नेत्यांनी आग लावली तेव्हा हे प्रकरण तापलं. जेव्हा उत्तरभारतातून रेल्वे भरतीसाठी मुलं आली त्यांना आम्ही प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी जसे उत्तर दिले त्यामुळे संघर्ष पेटला.

'नरेंद्र मोदींना कुणी काही विचारत नाही'

आम्ही काही आंदोलन केलं की प्रश्न विचारले जातात. काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये उत्तरभारतीयांना मारहाण करून परत पाठवण्यात आले होते. अगदी रेल्वेत बसवून देण्यात आले. त्यावेळी कुणी  पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारलं नाही. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना विचारलं नाही जरा त्यांनाही याच जाब विचारा असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.


'खपवून घेणार नाही'

एकदा तुम्ही तुमच्यात झाकून पाहिलं पाहिजे मग आम्हाला विचारावं. मला संघर्ष नकोय पण महाराष्ट्रामध्ये जे काही गुन्हे होत आहे त्याचा तपास हा उत्तरप्रदेश, बिहार, आसाम आणि बांग्लादेशच्या सीमेवर तपास सुरू आहे. इथं गुन्हे करायचे आणि तिथे पळून जायचं. हे इथं मुळीच खपवून घेतलं जाणार नाही. आमच्या आया-बहिणींवर हात उचालणार असाल तर मुळीच सहन केलं जाणार नाही अशा इशाराही राज ठाकरेंनी दिली.

मराठी तरुणांनाच प्राधान्य

मी तुमचे विचार समजू शकतो, तुमच्या अडचणी समजू शकतो, पण इथं महाराष्ट्रातील अनेक युवकांना रोजगार नाही. जर महाराष्ट्रात रोजगार उपलब्ध आहे तेव्हा यासाठी मराठी तरुणांना पहिली संधी मिळाली पाहिजे की नाही. तुमच्या राज्यात जर रोजगार उपलब्ध झाला. उद्योग, धंदे तिकडे गेले तर साहजिक तुम्ही तिथे नोकऱ्यांवर तुमचा पहिला अधिकार मागणार. मग आम्ही आमच्या मराठी मुलांसाठी हक्क मागितला तर काय चुकलं असा सवाल राज ठाकरेंनी केला.


अमिताभ बच्चन यांना टोला

अमिताभ बच्चन यांनी इथं कमावलं आणि तिथे जाऊन पैसा खर्च केला ही चांगली गोष्ट आहे पण इथं कमावलं त्यासाठी इथं खर्च का केला नाही ? एवढाच मी आक्षेप घेतला त्यात काहीही चुकीचं नव्हतं असा टोलाही राज ठाकरेंनी अमिताभ बच्चन यांना लगावला.

आता कळलं का?

मला संघर्ष करायचा नाही पण जर अशीच परिस्थिती राहणार असेल तर प्रत्येक राज्यात संघर्ष होईल. संघर्ष करायचा नाही हे तुम्ही तुमच्या माणसांना समजून सांगा जर नाही समजलं तर आम्ही आहोत. माझी भूमिका कालही तिच होती आणि आजही तिच आहे. तेच इथं सांगण्यासाठी आलो होते तुम्हाला आता कळलं ना असा सवाल करून राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.

=======================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2018 07:39 PM IST

ताज्या बातम्या