मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी

मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी

संध्याकाळी काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्री पुन्हा जोर धरल्याने दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरासह ठाणे आणि नवी मुंबईकरांची तारांबळ उडाली.

  • Share this:

08 जून : उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. मुंबई शहर, उपनगर आणि ठाण्यात काल संध्याकाळपासून पावसानं दमदार हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांना एक सुखद धक्का मिळाला. मान्सूनपूर्व पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढलं. संध्याकाळी काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्री पुन्हा जोर धरल्याने दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरासह ठाणे आणि नवी मुंबईकरांची तारांबळ उडाली.

यंदा मान्सूनने 7 जूनचा मुहूर्त जरी हुकवला असला तरी मान्सूनपूर्व पावसाने ७ जूनला मुंबईत जोरदार हजेरी लावली आहे. मान्सूनपूर्व पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका होणार आहे.

मान्सूनच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या महाराष्ट्राला मान्सूनपूर्व पावासानं झोडपायला सुरुवात केली आहे. मुंबईसह अलिबाग, कर्जत, उस्मानाबाद, सटाणा, नांदेडमध्ये मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.

दरम्यान, गोव्यापर्यंत येऊन ठेपलेल्या मा‌न्सूनची कोकणाच्या दिशेने समाधानकारक वाटचाल सुरू झाली आहे. पुढील २४ तासांत कोकणातील काही भागांत आणि गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्याच्या दृष्टीने समाधानकारक परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 8, 2017 10:12 AM IST

ताज्या बातम्या