मुंबई, 09 जून: मुंबईत (Mumbai Rains) मान्सूनने धडाक्यात एंट्री केली आहे. पावसाचा मध्य रेल्वेला (Mumbai local) फटका बसला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे, मुंबईच्या रस्त्यावरची शान असलेल्या बेस्ट बसमध्येही (Best bus) पावसाने शिरकाव केला आहे. त्यामुळे गळती लागली आहे. पाण्यात भिजू नये म्हणून ड्रायव्हर काकांना छत्रीच हातात घ्यावी लागली आहे.
मुंबई आणि उपनगरात मंगळवार रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासून मुंबईत पावसाने धुमशान घातले आहे. मुंबईकरांची खास असलेल्या बेस्ट बसला पावसाचा फटका बसला आहे. लॉकडाऊनची निर्बंध हटवल्यामुळे बेस्ट वाहतूक जोमाने सुरू झाली आहे. पण, पावसामुळे बसमध्ये गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
#MumbaiRains बेस्ट बसमध्ये गळती, छत्री हातात घेऊन ड्रायव्हर काकांची कसरत pic.twitter.com/svkTwVg9C1
— News18Lokmat (@News18lokmat) June 9, 2021
बसमध्ये पावसाचे पाणी बऱ्याच भागातून गळत आहे. एवढंच काय तर ड्रायव्हरच्या सीटवरही पाणी गळत आहे. त्यामुळे पाण्यात भिजू नये म्हणून चालकाने छत्रीचा आसरा घेतला आहे. विशेष म्हणजे, ही एसी मिनी बस आहे. दोन वर्षांपूर्वीच बेस्टच्या ताफ्यात या मिनी बस दाखल झाल्या आहे. कमी पैशात गारेगार प्रवास अशी बसची खासियत आहे. पण, पहिल्याच पावसात बसच्या बाहेर आणि आतही पावसाळा अनुभवायला मिळत आहे.
मुंबईत पावसाचा लोकल वाहतुकीवर परिणाम
मुंबईला रात्रभर पावसानं चांगलंच झोडपलं आहे. अजूनही हा पाऊस मुंबईच्या (Mumbai Rain) अनेक ठिकाणी सुरु आहे. मुंबईतल्या पश्चिम उपनगर अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव दमदार पाऊस सुरू आहे. तर पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु आहे. पावसामुळे रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे.
या मुसळधार पावसाचा लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सायन रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. पहिल्याच पावसात मुंबतील सखल भागासह अनेक रेल्वे स्थानकांमध्येही पाणी भरलं आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळ ट्रॅक पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.