नालासोपारा, 16 फेब्रुवारी : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संतप्त नागरिकांनी नालासोपारा येथे रेल रोको केला. यावेळी नागरिकांनी रुळावर उतरून पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. त्यामुळे सकाळी आठ वाजल्यापासून मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. शिवाय, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा देखील खोळंबा झाला होता. पण, आता हळहळू रेल्वे सेवा सुरळीत होत आहे.
यावेळी पोलिसांनी रुळावर उतरलेल्या नागरिकांना पांगण्याचा प्रयत्न देखील केला. पण, नागरिकांनी पोलिसांवर बाटल्या आणि दगड देखील फेकले. परिणामी परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं चित्र पाहायाला मिळत होतं. पण सध्या नागरिकांमधील संतापाला शांत करण्यात यश आलं असून 11 वाजून 40 मिनिटांनी रेल रोकोनंतरची पहिली लोकल मुंबईच्या दिशेनं धावली. सध्या लोकल काहीशा उशिराने धावत आहेत.
पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा
पुलवामामधील भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी नालासोपारामध्ये सकाळपासून बंद पाळण्यात आला आहे. बस सेवेवर देखील त्याचा परिणाम जाणवत आहे. बंदमुळे वसई - विरार पालिकेची बस सेवा देखील बंद ठेवण्यात आली आहे. यावेळी संतप्त प्रवाशांनी रेल रोको करत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकचा जोरदार निषेध केला. शिवाय, काहीही करून पाकिस्तानला धडा शिकवाच अशी मागणी देखील लोकांनी यावेळी केली. रेल रोकोमुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना काहीसा त्रास देखील सहन करावा लागला.
विक्रोळीमध्ये बंद
दरम्यान, पुलवामामधील हल्ल्याच्या निषेधार्थ विक्रोळी पार्क साईट आणि घाटकोपरच्या कामगार नगरमध्ये देखील व्यावसायिकांनी दुकानं बंद ठेवत आपला निषेध नोंदवला आहे. गुरूवारी पुलवामामध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यामुळे देशामध्ये सध्या पाकविरोधी वातावरण असून नागरिकांनी दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली आहे.
'जवानांना कारवाईची मुभा'
दरम्यान, यवतमाळ येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना कुठे, कधी आणि कशी शिक्षा द्यायची हे भारतीय जवानच ठरवतील असं म्हटलं आहे. त्यामुळे दहशतवाविरोधातील कारवाई आता अधिक कडक होणार हे निश्चित. पुलवामामधील दहशतावादी हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन वीरपुत्र देखील शहीद झाले.