मध्य रेल्वे 'रुळावर'; आंदोलकांना प्रशासनाकडून लेखी आश्वासन

मध्य रेल्वे 'रुळावर'; आंदोलकांना प्रशासनाकडून लेखी आश्वासन

माटुग्यांत रेल्वे अॅप्रेंटिस विद्यार्थी संघटनेनं आज सकाळी ७ पासून सुरू केलेलं आंदोलन अखेर साडेतीन तासांनंतर म्हणजेच साडेदहाच्या सुमारास मागे घेण्यात आलंय.

  • Share this:

20 मार्च : माटुग्यांत रेल्वे अॅप्रेंटिस विद्यार्थी संघटनेनं आज सकाळी ७ पासून सुरू केलेलं आंदोलन अखेर साडेतीन तासांनंतर म्हणजेच साडेदहाच्या सुमारास मागे घेण्यात आलंय. आंदोलनकर्ते आणि रेल्वे अधिकारी यांच्यात काही वेळातच चर्चा होणार आहे. आंदोलनकर्ते लेखी आश्वासनासाठी दादर स्टेशनला दाखल झालंय. रेल्वे भरती परीक्षा गोंधळाविरोधात जवळपास 500 विद्यार्थ्यांनी हा चक्का जाम केला होता. यामुळे सीएसएमटीच्या दिशेनं जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प केली तर प्रवाशांनी रेल्वे रुळावर उतरुन पायी प्रवास करण्यासही सुरुवात केली.

रेल रोकोची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचलं. पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्राच स्वीकारला होता. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत रेल्वे रुळ सोडणार नाही, असा पवित्रा आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतला होता.

दरम्यान, पोलिसांनी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यानं विद्यार्थी आणखी आक्रमक झाले. विद्यार्थ्यांनी दगडफेकही करण्यास सुरवात केली. दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून दादर आणि माटुंगा रेल्वे स्थानकापासून बेस्टच्या अतिरिक्त बस सेवा सरू करण्यात आली होती.

नेमक्या मागण्या काय?

- अप्रेटिंस विद्यार्थ्यांनी अनेक वर्षे काम करुनही जागा भरल्या नाहीत

- रेल्वेत अडीच लाख जागा रिक्त

- 20 टक्के कोटा कायमस्वरुपी रद्द करावा

- रेल्वे अॅक्ट अॅप्रेंटिस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना रेल्वे सेवेत कायमस्वरुपी सामाविष्ट करण्याची मागणी

- रेल्वे जीएम कोट्यातून भरतीची मागणी

पूर्वी रेल्वे अप्रेटिंसना थेट रेल्वेत सामावून घेतलं जायचे, पण आता त्यासाठी 20 टक्के इतका कोटा ठरवला गेलाय. शिवाय, एक लेखी परीक्षाही द्यावी लागते. त्यामुळे रेल्वेतल्या संधी कमी झाल्याचा तरुणांचा आरोप आहे.

मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचाही इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. यामध्ये अनेक मराठी तरुणांचाही समावेश आहे.

First published: March 20, 2018, 8:10 AM IST

ताज्या बातम्या