'कृष्णकुंज'ला कुणाची चिथावणी होती? विखे पाटलांचे राऊतांना जशास तसे उत्तर

'कृष्णकुंज'ला कुणाची चिथावणी होती? विखे पाटलांचे राऊतांना जशास तसे उत्तर

'अर्धी नाळ आपल्या नेत्यासोबत आणि अर्धी नाळ शरदाच्या चांदण्यात भिजतेय असा दुटप्पीपणा कोण करतेय ते ही लपून राहिलेले नाही'

  • Share this:

मुंबई, 22 जून : शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये  चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. संजय राऊतांनी सामनाच्या अग्रलेखातून सडकून टीका केल्यानंतर विखे पाटलांनी आज राऊतांना पत्र लिहून जशास तसे उत्तर दिले आहे.

'मी आपल्या कृपेनं राजकारणात आलेलो नाही. त्यामुळे आपल्या सल्ल्याने राजकारणापासून दूर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मला, माझ्या मुलाला व आतापर्यंत माझ्या घराण्याला नगरच्या जनतेनं खूप काही दिलं आहे. आपची बांधिलकी त्या जनतेशी आहे, आमची बांधिलकी कधी सिल्व्हर ओक तर कधी मातोश्री अशा अस्वस्थ येरझारा घालत नाही. अर्धी नाळ आपल्या नेत्यासोबत आणि अर्धी नाळ शरदाच्या चांदण्यात भिजतेय असा दुटप्पीपणा कोण करतेय ते ही लपून राहिलेले नाही' असा सणसणीत टोला विखे पाटलांनी राऊत यांना लगावला आहे.

'बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात 'सामना'मध्ये धारदार अग्रलेखाची परंपरा होती. तेव्हा खरेच रोखठोक अग्रलेखात आजच्यासारखी लाचारी त्यावेळेस नव्हती. शिवसेनेचे प्रवक्तेपद सोडून काँग्रेस समितीचे प्रवक्तेपद टाळेबंदीच्या काळात स्वीकारले आहे का? आम्ही राजकीय पक्ष बदलेल पण ज्या पक्षात राहिलो त्याचे निष्ठेने काम केले आमची छाती फाडून पाहिले तर एका वेळी एकच नेता दिसेल तुमची छाती फाडली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोघेही दिसतात. तुमचा हा बेगडीपणा लोकांना चांगलाच कळतो.  त्यामुळे तुम्हाला फारसे गांभीर्याने घ्यायचे नसते हे आता लोकांना समजू लागले आहे' असा टोलाही  विखे पाटलांनी राऊतांना लगावला आहे.

'एकीकडे राजभवनात बाबत धमकीवजा भाषा करायची आणि दुसरीकडे वाकून लावून राजभवनावर कुनिर्सात हे कोलांटीउडीचे डोंबारी राजकारण आपण किती सहज करता हे अलीकडे वारंवार बघितला आहे', अशी कडवट टीकाही विखे पाटलांनी केली.

'मी भाजपमध्ये आनंदी आहे पण महाविकास आघाडी सरकारचा एक शिल्पकार असल्याच्या अविर्भावात  असणार्‍या व्यक्तीला आपल्या भावाला मंत्री देखील करू न शकल्याचे दुःख असेल आणि त्यातूनच आलेली कमालीची अस्वस्थता दाबून ठेवण्याचा नाहक त्रास होत असेल तर त्यात माझा काय दोष? थोरातांची कमळा असा काहीसा उल्लेख आपण अग्रलेखात केला आहे. कमळ हातात घेण्यासाठी रात्रीच्या अंधारात कोण? केव्हा कुठे कशी चाचपणी केली होती? हा एक वेगळा इतिहास आहे ती चाचणी यशस्वी झाली असती तर आपण केलेले उल्लेख कदाचित खरा ठरला असता.' असं म्हणत विखेंनी राऊतांना चिमटा काढला.

पुलवामामध्ये 2 दहशतवाद्यांना ठार मारलं, पण सोलापूरचे सुनिल काळेंना वीरमरण

'मातोश्रीविरुद्ध बंड करण्यासाठी कृष्णकुंजला कुणाची चिथावणी होती आणि कोणी वेळेवर यु-टर्न घेतले हा इतिहास अनेकांना माहीत आहेच. मी वेगळं काय सांगावं असं सांगत पवार  थोरात आणि राऊत यांच्यावर देखील विखे यांनी निशाणा साधला आहे.

काय म्हणाले होते राऊत?

'जगभरातील विनोदी साहित्यात विसराळूपणा हे विनोदाचे अंग बनले आहे. मराठी रंगमंच आणि पडद्यावरही ‘विसराळू’ पात्र खास आणून विनोद निर्माण केला जातो. अशा विसराळू पात्रांत आता नगर जिल्ह्यातील राधाकृष्ण विखे-पाटलांची भर पडली आहे. ते विसरण्याच्या कलेत किती पारंगत आहेत याचे प्रयोग ते स्वतः अधूनमधून करीत असतात. विखे महाशयांनी दोनेक दिवसांपूर्वी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याबाबत असे महान भाष्य केले की, ‘‘एवढी वर्षे काँग्रेससोबत होतो, मात्र सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष आपण यापूर्वी कधीच पाहिले नाहीत.’’ यावर शांत बसतील ते थोरात कसले! थोरातांनीही सांगितले की, ‘‘मी विखे यांना आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना अनेकदा पाहिले आहे!’’ यावर विसराळू विखेंची बोलती बंद झाली. काचेच्या घरात राहणार्‍यांनी दुसर्‍यांच्या घरावर दगड मारू नयेत हा साधा नियम विखे विसरले असतील तर त्यांनी राजकारणातून तूर्त दूर झालेलेच बरे' असा सणसणीत टोला सेनेनं विखे पाटलांना लगावला.

धोका वाढला! माजी आरोग्य मंत्र्याला कोरोनाची लागण

'विखे पक्षाशी कधीच एकनिष्ठ नसतात'

'विखे अनेक वर्षे काँगेस पक्षात होते हा आता इतिहास झाला. वरचेवर पक्ष बदलण्याची कला त्यांना अवगत आहे व आपण आधीच्या पक्षात असताना काय उद्योग केले हे विसरण्याच्या कलेतही ते पारंगत आहेत. विखेंची मूळ पोटदुखी अशी आहे की, नगर जिल्ह्याच्या राजकारणातील त्यांचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात हे आता सत्तेत आहेत व निवडणुकीआधी सत्तेसाठी भाजपच्या चरणी लीन होऊनही विखे वनवासात आहेत. लाचारी व बेइमानी हे शब्द कोणी कोणासाठी वापरावेत यावर राजकारणात एक आचारसंहिता निर्माण होणे गरजेचे आहे. विखेंसारखे नेते थोरातांवर लाचार वगैरे शब्दबाण सोडतात तेव्हा त्यांच्या विसराळूपणाचे कौतुक वाटते. विखे ज्या पक्षात जातात त्या पक्षाशी ते कधीच एकनिष्ठ नसतात' अशी टीका विखेंवर  करण्यात आली.

संपादन - सचिन साळवे

First published: June 23, 2020, 10:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading