भाजपला मोठा धक्का, राधाकृष्ण विखेंची घरवापसी?

भाजपला मोठा धक्का, राधाकृष्ण विखेंची घरवापसी?

भाजपने विधानसभा निवडणुकीआधी मेगाभरती केली होती. आता या मेगाभरतीतून आलेले नेते परतीच्या वाटेवर असल्याचं समोर आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 27 डिसेंबर :  सत्तेतून पायउतार झाल्यानंतर आता भाजपला एकापाठोपाठ एक हादरे बसत आहे. विशेष म्हणजे, भाजपने विधानसभा निवडणुकीआधी मेगाभरती केली होती. आता या मेगाभरतीतून आलेले नेते परतीच्या वाटेवर असल्याचं समोर आलं आहे. त्यातच भाजपमध्ये दाखल झालेले राधाकृष्ण विखे पाटील हेही घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

कट्टा या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, राधाकृष्ण विखे पाटील हे स्वगृही परतण्यासाठी कामाला लागले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लीकार्जुन खर्गे यांची एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली असल्याचं सांगितलं जातं आहे.

विखे पाटील यांनी स्वगृही परत येण्याचे ठरवले जरी असले तरी त्यांच्या परतीच्या निर्णय हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावरही अवलंबून असणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय हा अध्यक्षा सोनिया गांधी घेणार आहे. विशेष म्हणजे, विखे पाटील पक्षात परत यावे अशी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची इच्छा आहे. त्यासाठीच त्यांचे प्रयत्न देखील सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

नगरच्या निकालावरून भाजपमध्ये धुसफूस

विशेष म्हणजे, भाजपमध्ये कमालीची धुसफूस सुरू आहे.विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षात वाढलेल्या नाराजीवर मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक कामगिरीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री राम शिंदे हे पहिल्यांदाच एकमेकांसमोर आले.

भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या बैठकीमध्ये माजी मंत्री राम शिंदे यांनी विखे पाटील यांच्यामुळे पराभव झाल्यानं नाराजी व्यक्त केली होती. त्याबद्दल काही प्रश्न होते ते बैठकीत त्यांनी विचारले. त्यावर उत्तरे मिळाली असल्याचंही राम शिंदे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

राम शिंदे म्हणाले की,  विखे पाटील आणि आम्ही पहिल्यांदाच समोरासमोर आलो. दोघांनीही पक्षासमोर एकमेकांची भूमिका मांडली. आता यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. अहमदनगर जिल्हा कोअर कमिटीचे सदस्य आणि प्रदेश नेतृत्व यांच्यात चर्चा झाली. विधानसभा निवडणूकीसह जिल्हा परिषदेबाबत तासभर चर्चा झाली.

विधानसभा निवडणुकीत जे काही झालं त्याबद्दल सर्व उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेतलं आहे. दोन्ही बाजू ऐकून घेतल्या असून आमचं समाधान झालं आहे. आता यावर विजय पुराणिक हे भाजपचे संघटन मंत्री अहवाल सादर करतील आणि त्यानंतर पुढची कार्यवाही करतील असंही राम शिंदे यांनी सांगितले.

विखे पिता-पुत्रावर कारवाईची शक्यता

निवडणुकीपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांचा पक्षात प्रवेश झाल्यामुळे पक्षाच्या जिल्ह्यात जागा वाढतील, असा अंदाज होता. पण माजी मंत्री राम शिंदे यांच्यासह अनेकांचा पराभव झाल्यामुळे विखे पाटलांविरोधात पक्षात नाराजी पसरली आहे.  राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर नगरमध्ये पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. राम शिंदेंसह अनेक भाजप नेत्यांनी विखेंविरूद्ध तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे विखे पिता-पुत्रावर कारवाईची शक्यता आहे.

First published: December 27, 2019, 8:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading