मुंबई, 24 फेब्रुवारी : मुंबईच्या डीपी प्लॅनवर केलेल्या वक्तव्यावर मी ठाम आहे. त्यासाठी मी न्यायालयीन लढा देईन. मांडवली करायला किंवा यु टर्न घ्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही अशा शब्दात विधानसभा विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विखे पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यांवर देखील सरकारला लक्ष्य केलं.
काय आहे विखे पाटलांचं प्रकरण?
मुंबईच्या विकास आराखड्यात बदल करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने 10 हजार कोटींची डील केली. या डीलमधील 5 हजार कोटींचा पहिला हफ्ता पोहोचल्याचा घणाघाती आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी डिसेंबर 2018मध्ये केला होता. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना मानहानीची नोटीस पाठवणार असल्याचं म्हटलं होतं.
शिवाय, मुख्यमंत्री फडणवीस आणि मुंबईच्या पालिका आयुक्तांनी मुंबईचा सौदाच केल्याचं त्यांनी त्यांच्या आरोपामध्ये म्हटलं होतं. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विखे पाटलांनी मुंबईचा डीपी प्लॅन समजून घेतला असता तर आरोप करायची वेळ आली नसती असं प्रत्युत्तर दिलं होतं.
यावर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये विचारले असता विखे पाटील यांनी मांडवली करायला किंवा यु टर्न घ्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही असं उत्तर दिलं.