मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /परदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना पैशाच्या बदल्यात देत होता क्वारंटाइनमधून सवलत; अभियंत्याला अटक

परदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना पैशाच्या बदल्यात देत होता क्वारंटाइनमधून सवलत; अभियंत्याला अटक

क्वारंटाईनमधून सूट देण्याबाबतचा अयोग्य प्रकार लक्षात आल्यानंतर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली

क्वारंटाईनमधून सूट देण्याबाबतचा अयोग्य प्रकार लक्षात आल्यानंतर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली

क्वारंटाईनमधून सूट देण्याबाबतचा अयोग्य प्रकार लक्षात आल्यानंतर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली

मुंबई, 15 जानेवारी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईनमधून अवैधरित्या सूट देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून पैसे घेणाऱ्या दुय्यम अभियंत्यास महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ निलंबित केलं आहे. या प्रकरणात तातडीने चौकशी सुरु करण्यात आली आहे. याप्रकरणी मनपा कर्मचाऱ्यांसह एकूण तीन जणांविरुद्ध प्रशासनाने पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे.

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळल्यानंतर त्याचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारसह महानगरपालिका प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत. युकेसह, इटली, दक्षिण आफ्रिका, युरोप व मध्य-पूर्व देशांमधून हवाई मार्गे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतराराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना सक्तीने क्वारंटाईन करण्यात येत आहे. त्यासाठी विमानतळावर महानगरपालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांची तीन शिफ्टमध्ये नियुक्तीदेखील केली आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, बेस्ट, प्रादेशिक परिवहन कार्यालय यांचेही कर्मचारी मदतीला नेमण्यात आले आहेत.

क्वारंटाईनमधून सूट देण्याबाबतच्या नियमांचे पालन करताना काही अयोग्य घडत असल्याची बाब लक्षात आल्याने महानगरपालिका प्रशासनाने स्वतःहून विमानतळ प्रशासनासह संबंधितांना बारकाईने देखरेख करण्याबाबत गोपनीय पत्र दिले आहे. त्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाला देखील सतर्क करण्यात आले आहे. त्यानंतर हा गैरप्रकार समोर आला.

हे ही वाचा-Explainer: दक्षिण कोरियन विद्यापीठातले विद्यार्थी हिंदीसाठी का झाले आक्रमक?

विमानतळावर कर्तव्यार्थ नेमलेल्या महानगरपालिकेच्या सेवेतील दुय्यम अभियंता (वास्तूशास्त्रज्ञ) दिनेश एस. गावंडे हा विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना चुकीच्या व अवैध पद्धतीने क्वारंटाईनमधून सूट देत असल्याची तसेच त्याला अन्य दोघे मदत करत असल्याची बाब समोर आली. हा प्रकार त्यांनी रात्रपाळीवर कर्तव्यार्थ असलेले सत्रप्रमुख तथा महानगरपालिकेच्या एच/पश्चिम विभागातील कार्यकारी अभियंता वकार जावेद हफिझ यांच्या निदर्शनास आणून दिला. या प्रकाराची तातडीने दखल घेऊन हफिझ यांनी दिनेश गावंडे यांना विचारणा केली. तसेच सीआयएसएफच्या मदतीने झडती घेवून त्याच्याकडून बनावट शिक्के व रक्कम जप्त केली. हवाईमार्गे प्रवास करुन मुंबईत येणाऱ्या प्रवाशांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. नियमांची कठोर अंमलबजावणी महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे, असे आवाहन यानिमित्ताने प्रशासनाकडून पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

First published:

Tags: Coronavirus, Mumbai