मुंबई, 01 मार्च : सगळे सरकारी कायदे, नियम आणि शिक्षा या फक्त सर्वसामान्यांनाच आहेत का? असा प्रश्न पुन्हा एकदा पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातच कोरोनाच्या नियमांना केराची टोपली दाखवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.वरळी भागातील पब्ज रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचा पर्दाफाश मनसेनं केला आहे.
आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात ज्यात महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वाॅर्डचाही समावेश होतो, तिथले सगळे पब्ज वीक एंडला कसे फुल्ल सुरू असतात याची पोलखोलच मनसेचे नेते संतोष धुरी यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केली आहे. सोमवारी रात्री 12.30 वाजेपर्यंत मोठी गर्दी करत या पब्जमध्ये तरुण तरुणी संगीताच्या तालावर थिरकताना दिसत आहे. यात कोरोनाचे नियम कसे पायदळी तुडवले जातायत हे अगदी स्पष्ट दिसतंय. मग सर्वसामान्यांना एक न्याय आणि श्रीमंतांना वेगळा न्याय आहे हे स्पष्ट दिसतंय, अशी टीका धुरी यांनी केली.
'महाराष्ट्रात काही ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लाॅकडाऊन केले जात आहे. तिथे वरळीतल्या कमाल मिल, फिनिक्स मिल इथे मात्र सगळे नियम पायदळी तुडवल्याचं चित्र आहे. एकीकडे स्वत: महापौर किशोरी पेडणेकर यांनी दादरच्या भाजी विक्रेत्यांना मास्कचं वाटप केलं आणि या पब्जकडे कानाडोळा का ? असा सवाल आता या निमित्ताने विचारला जातोय. एकंदरीतच या कोरोना काळातही वरळी मतदारसंघात जोरदार ‘नाईटलाईफ’ सुरू आहे.
“कोरोनाबद्दलचे नियम फक्त सामान्य माणसांनाच लागू आहेत का ? धनदांडग्यांना सर्व काही माफ आहे का ? सर्वसामान्य लोकांनाच कोरोनाची भीती दाखवायची आणि श्रीमंतांच्या पोरांना नाईटलाईफ हे असं कसं असू शकेल” असा सवाल संतोष धुरी यांनी विचारला. “हेच का ते मुख्यमंत्र्यांच आवाहन ? मुख्यमंत्र्यांचं कुणी मंत्री ऐकत नाही. गर्दी करू नका सांगितलं तर राठोडसारखे मंत्री शक्तीप्रदर्शन करतात, आता तर त्यांचे मंत्री आणि पुत्र, युवराज पण त्यांचं ऐकत नाही का ? त्यांच्या मतदार संघात गर्दीला कोरोनाची भीतीच नाही का? हीच का यांची नाईटलाईफ ? मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत जनतेला नियम सांगतात आणि इथे त्यांच्या युवराजाच्या मतदार संघात सगळे पब्ज फुल्ल आहेत. याचाच अर्थ आता युवराजही यांचं ऐकत नाहीत का ?” असा प्रश्नांचा भडीमार धुरी यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.