मुंबई, 13 ऑक्टोबर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील भाजप नेत्यासाठी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक ट्विट केलं आहे. विशेष म्हणजे, हे ट्विट मराठीतून आहे. त्यामुळे या ट्विटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील यांनी आपले आत्मचरित्र लिहिले आहे. त्यांच्या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. त्यामुळे खुद्द पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमाबद्दल मराठीतून ट्वीट केले आहे.
'मी उद्या (13 ऑक्टोबर) रोजी सकाळी अकरा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बाळासाहेब विखे पाटील यांचं आत्मचरित्र प्रकाशित करणार आहे,' अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करून दिली आहे.
मी उद्या सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून श्री बाळासाहेब विखे पाटील यांचे आत्मचरित्र प्रकाशित करणार आहे. कृषी आणि सहकारक्षेत्र मजबूत करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न नेहमी स्मरणात राहतील. हा कार्यक्रम नक्की बघा.
— Narendra Modi (@narendramodi) October 12, 2020
तसंच, 'कृषी आणि सहकार क्षेत्र मजबूत करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न नेहमी स्मरणात राहतील. हा कार्यक्रम नक्की बघा',असं आवाहनही नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन प्रकाशन होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील ऑनलाइन उपस्थिती राहणार आहे. लोणी येथील धनंजय गाडगीळ सभागृहात अनेक मान्यवर राहणार उपस्थित आहे. केंद्रीय मंत्री दानवे, देवेंद्र फडणवीस यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी नेतेही या सोहळ्याला हजर राहणार आहे. परखड व्यक्तिमत्त्व असणारे बाळासाहेब विखे यांच्या पुस्तकात अनेक राजकीय गौप्यस्फोट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Narendra modi, भाजप