Elec-widget

कायद्यात टिकणारे आरक्षण द्या, मराठा आंदोलकांचा पवित्रा

कायद्यात टिकणारे आरक्षण द्या, मराठा आंदोलकांचा पवित्रा

आम्ही आजपर्यंत सरकारकडे आरक्षणासह २० मागण्या केल्या आहेत. आरक्षणासह या मागण्या मान्य झाल्या पाहिजे.

  • Share this:


स्वाती लोखंडे,प्रतिनिधी


मुंबई, 27 नोव्हेंबर : कसं आरक्षण द्यायचं हे सरकारने पाहावे, कायद्यात टिकणारं आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही असा पवित्रा  मराठा क्रांती मोर्च्याच्या आंदोलकांनी घेतला आहे.


Loading...

मुंबईतील आझाद मैदानावर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरू आहे. आज मराठा आंदोलकांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी आंदोलकांकडून माऊली पवार, विरेंद्र पवार, संजय घोर-पाटील यांनी  सरकारवर आरोप केले.

मुंबईत येण्यापासून मराठा बांधवांना ठिकठिकाणी अडवले जात आहे. त्यांच्यावर पाळत ठेवून पोलिसांकडून रोखले जात आहे. राज्य सरकारने हे तातडीने थांबवले पाहिजे. पोलीस आम्हाला सांगत आहे की, भगवा झेंडा गाडीला लावून मुंबईत येऊ नका, असा कोणता कायदा आहे ज्यात असे सांगितले आहे. आरक्षण मिळणार आहे त्या क्षणासाठी साक्षीदार होण्यासाठी मराठा तरुण हे मुंबईत येत आहे. त्यांना रोखू नका अशी मागणी आंदोलकांनी केली.


मराठा आरक्षणासाठी ४० तरुणांनी आत्महत्या केली होती. सरकारने त्या तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन सरकारने अजूनही पूर्ण केले नाही.  सरकारने दिलेलं आश्वासन पाळलं पाहिजे अशी मागणीही आंदोलकांनी केली.


आम्ही आजपर्यंत सरकारकडे आरक्षणासह २० मागण्या केल्या आहेत. आरक्षणासह या मागण्या मान्य झाल्या पाहिजे. कोपर्डी प्रकरणातील आरोपीला फाशी झाली पाहिजे. अॅट्रासिटी कायद्यांचा गैरवापर थांबला पाहिजे, शेतकरी हमी भावाबद्दल निर्णय घेतल्या पाहिजे, वसतीगृह, निर्वाह भत्ता, अशा सगळ्या योजना लागू झाल्याचं पाहिजे या आमच्या प्रमुख मागण्या आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदानावरुन मागे हटणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला.


तसंच मराठा आंदोलनादरम्यान मराठा तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा सरकारने केली पण गुन्ह्यासाठी गठीत केलेल्या समितीची एकही बैठक झाली नाही आणि एकही गुन्हा मागे घेतला गेला नाही. सरकारने मराठा बांधवांवरील गुन्हे मागे घेतलेच पाहिजे अशी मागणीही आंदोलकांनी केली.


जे विधेयक मांडले जाणार आहे, त्या विधयेकबाबत मराठा समाजाला काही रस नाही. आम्हाला कायद्यात टिकणारे आरक्षण पाहिजे आहे. सर्वांनी एकमताने मराठा आरक्षणासाठी पाठिंबा द्यावा असं आवाहनही आंदोलकांनी विरोधकांना केलं.तसंच जेव्हा आरक्षण मिळेल तेव्हा आम्ही इथून जाऊ असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.


दरम्यान, मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देणार आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. आम्ही स्वतंत्र आरक्षण देणार पण विरोधकांच्या मनात काळंबेरं आहे अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. राज्य सरकार जी काही कारवाई करत आहे ती नियमाने करत आहे. कायद्यात स्पष्टपणे म्हटलं आहे की वार्षिक रिपोर्ट आणि अॅक्शन टेकन रिपोर्ट द्यायचा आहे. विधेयक मांडण्याआधी सभागृहात एटीआर मांडण्यात येईल असं देखील मुख्यमंत्री म्हणाले.


52 टक्के आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देणार आहोत. मुख्यमंत्री सभागृहात बोलत असताना सभागृहात अभूतपूर्व गदारोळ झाला. त्यानंतर सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं.


तर दुसरीकडे मराठा आरक्षणाबाबत आम्ही टोकाची भूमिका घेत नाही. आम्ही चुकलो असू पण आता तुम्ही दिलेला अहवाल तर सादर करा अशी मागणीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी केली. विधेयक मांडण्यापूर्वी समजू द्या की अहवालात काय आहे. विधेयक सादर करताना कोणीही खोडा घालणार नाही असा इशाराही अजित पवारांनी दिला.


=================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2018 05:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...