मुंबई 23 सप्टेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या 7 राज्यातल्या मुख्यमंत्र्यांशी कोरोना स्थितीवर चर्चा केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सहभागी झालेल्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना आपापल्या राज्यातली स्थिती सांगितली. यावेळी पंतप्रधानांनी महाराष्ट्र के लोग बहादुरीसे सामना करते है असं कौतुक केलं. कोविडचा संसर्ग जास्त असलेल्या महाराष्ट्रातल्या 20 जिल्ह्यात विशेष समर्पित पथके नियुक्त करून संसर्ग कमी केल्यास देशाच्या कोरोना आकडेवारीवर परिणाम होईल अशी सूचना करत त्यांनी चिंताही व्यक्त केली.
पंतप्रधान म्हणाले, देशात 700 जिल्हे आहेत आणि त्यात 7 राज्यांमधल्या फक्त 60 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. त्यात महाराष्ट्रातले 20 जिल्हे आहेत ही चिंतेची बाब आहे.
या जिल्ह्यांमधला कोरोनाचा प्रसार कसा आटोक्यात आणता येतील याची काळजी घ्या असला सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
मुख्यमंत्री म्हणाले, माझे कुटुंब , माझी जबाबदारीसारख्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत असून त्याचा परिणाम येणाऱ्या काळात मृत्यू दर आणि कोविड पॉझिटिव्हिटी दर कमी झालेला आपल्याला दिसेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यात सर्वत्र टेलीआयसीयू व्यवस्था उभारून ग्रामीण भागातील रुग्णांना वेळीच उपचार कसे मिळतील हे आम्ही पाहणार आहोत असेही ते सांगितले.
कोविडनंतर देखील रुग्णांमध्ये वैद्यकीय उपचारांची गरज असून उपचार केंद्रे सुरु करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली.