मुंबई, 13 डिसेंबर : आजवर आपण अनेक महिलांना ढोलकीच्या तालावर नाचताना पाहिलं असेलं. ढोलकीच नाव घेतलं की वादक हे पुरुषच असतील, असा विचार मनात येतो. मात्र, पुरुषी मक्तेदारीला छेद देत मुंबईच्या प्रेषिता मोरे या तरुणीने ढोलकी वाजवण्याच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये तिने उपस्थिती लावलेली असून आपल्या ढोलकीच्या तालामुळे एक वेगळी ओळख रसिकांमध्ये निर्माण केली आहे.
कशी झाली ढोलकी वादनाची सुरुवात?
मुंबईत विक्रोळी परिसरात राहणारी प्रेषिता हिने मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीतून ‘लोकवाद्य’ या विषयात डिप्लोमा केला. त्यांनतर ढोलकी वादनामध्ये करिअर करणाऱ्याचं प्रेषिता मोरेने ठरवलं. प्रेषिताला ढोलकी वाजविण्यासाठी घरातून हवं तसं वातावरण मिळालं. त्यानंतर प्रेषिताने मेहनतीनं ढोलकी सारख्या लोकवाद्याच्या सूक्ष्म तालीचा, लयीचा अभ्यास केला. ढोलकीत दडलेला नाद तिनं अपार कष्टाने आणि अत्यंत नजाकतीने कमावला आहे.
खरा मावळा! 27 वर्षांपासून एक पैसा न घेता महाराजांची सेवा करणारे मेहबूब हुसेन, Video
प्रेषिता सांगते की, सुरुवातीला जेव्हा मी ढोलकी वाजवली तेव्हा घरच्यांचा पूर्ण पाठींबा होता. मात्र, समाजाला स्वीकारायला थोडा वेळ लागला. सुरुवातीला अनेक जण म्हणायचे मुली ढोलकी वाजवत नाहीत. मुलींनी ढोलकी वाजवली तर त्यांच्या हाताला चव राहत नाही. मात्र, हे किती खरं आहे मला माहित नाही माझ्या हाताला आजही चव आहे. प्रेषिता ही ढोलकी सोबत संबळ, पखवाज असे वाद्य वाजवते. सुरुवातीला असं वाटायचं जमेल का नाही जमेल, कारण माझ्या दिसण्यापेक्षा ढोलकी जड वाटत होती. पण आता प्रेक्षक डोक्यावर घेतात. त्यांचा प्रतिसाद बघून आणखी काम करण्याची ऊर्जा मिळते.
माझ्या आवडीने स्वस्त बसू दिलं नाही
काही ठिकाणी ढोलकी वाजवत असताना एखादा पुरुष त्या तालावर लावणी सादर करत असतो. बघितलं तर आज दोन जागा बदलल्या आहेत. जिथे स्त्री लावणी करत होती तिथे आज पुरुष आहे आणि पुरुष ढोलकी वाजवतात तिथे आज एक स्त्री आहे. एक अनुभव असा पण होता की अपघातानंतर डॉक्टरांनी ढोलकी वाजवायची नाही असं बजावलं होत. मात्र मला माझ्या आवडीने स्वस्त बसू दिलं नाही. पुन्हा सराव सुरू केला. थांबलेली बोटं पुन्हा ढोलकी वर पडली आणि एका ठराविक वेळेनंतर ढोलकीने मला पुन्हा स्वीकारलं असं प्रेषिता सांगते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.