'CAA चा हिंदूंनाही बसणार फटका', प्रकाश आंबेडकर जाहीर करणार यादी

'CAA चा हिंदूंनाही बसणार फटका', प्रकाश आंबेडकर जाहीर करणार यादी

NRC आणि CAA विरोधात वंचित आघाडीने 24 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई, 19 जानेवारी : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. NRC आणि CAA विरोधात वंचित आघाडीने 24 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

'केंद्र सरकार लागू करत असलेल्या NRC आणि CAA या कायद्याचा 40 टक्के हिंदूंनाही फटका बसणार आहे. हिंदूंमधीलही अनेक नागरिकांकडे कागदपत्रे नाहीत. अशा हिंदू जाती-जमातींची यादी आम्ही जाहीर करणार आहोत,' अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या यादीत मुस्लिमांचा समावेश नसेल, कारण मुस्लीम समाज अगोदरच या कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरला आहे, असं प्रकाश आंबडकर म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये महाराष्ट्र बंदच्या बाबत चर्चा झाली. हा बंद शांततेत करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही NRC आणि CAA विरोधात दादर टीटी इथंही आंदोलन केलं होतं. ते आंदोलनही शांततेत पार पडलं होतं. त्यामुळे 24 जानेवारीचा महाराष्ट्र बंदही आम्ही शांततेतच पार पाडू, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

कपिल सिब्बल यांच्या विधानाबद्दल काय म्हणाले?

काँग्रेसने CAA कायद्याला पूर्ण ताकदीने विरोध केला आहे. मात्र असं असतानाच काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी केंद्रीयमंत्री कपिल सिब्बल यांनी सर्व राज्यांना हा कायदा लागू करावाच लागेल असं म्हटलं आहे. हा कायदा लागू करण्यापासून कुठलंही राज्य नकार देऊ शकत नाही असंही त्यांनी सांगितलं. केरळ लिटररी फेस्टीव्हलमध्ये बोलताना त्यांनी हे मत व्यक्त करत आपल्याच पक्षाला आरसा दाखवल्याचं बोललं गेलं. यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 'केंद्राचा कायदा सर्व राज्यांना लागू होतो ही गोष्ट खरी आहे. पण राज्यांना वेगळं मत मांडण्याचा अधिकार आहे.'

दरम्यान, शिवसेनेचे युवा नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या गेलेल्या नाईट लाईफचं प्रकाश आंबेडकर यांनी समर्थन केलं आहे. 'मी नाईट लाईफ जगतच मोठा झालो आहे. ज्यांना मुंबईची माहिती नाही तेच याला विरोध करत आहेत,' असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2020 02:40 PM IST

ताज्या बातम्या