सागर कुलकर्णी, प्रतिनिधी
मुंबई, 05 फेब्रुवारी : पूनम महाजन यांनी युवा मोर्चा कार्यक्रमात शरद पवार यांचा शकुनीमामा असा उल्लेख केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर पूनम महाजन यांच्या विरोधात जोरदार टीका केली आहे. आज एनसीपी युवक वतीने मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टरबाजी करत प्रमोद महाजन यांच्या मृत्यू प्रकरण उकरून काढत एनसीपीने महाजन यांच्यावर टीका केली आहे.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सूर्यासारखे आहेत. तर शरद पवार हे शकुनी मामा आहेत,’ असं विधान भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी केलं होतं. सीएम चषक या मुंबईतील कार्यक्रमात बोलताना पूनम महाजन यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच हल्लाबोल केला होता. त्यावर आता राष्ट्रवादीकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.
महागठबंधन नाहीये ते तर महाठगबंधन आहे, असं म्हणत पूनम महाजन यांनी विरोधकांच्या आघाडीची खिल्लीही उडवली होती. पूनम महाजन यांनी आक्रमक होत विरोधकांवर जोरदार टीका केली होती.
राजकारणात अॅक्शन केली की त्यावर लगेच रिअॅक्शन देण्यात येते. आताही राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून पूनम महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुंबईच्या महत्त्वाच्या ठिकाणी पोस्टरबाजी करत त्यांनी महाजनांच्या सलत्या जागेवर मीठ चोळलं आहे.
VIDEO : दार तोडून मारूती स्विफ्ट थेट पोहोचली बँकेत!