मुंबई, 26 फेब्रुवारी : पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू आहे. या प्रकरणातील विविध फोटो आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतरही अद्याप कोणावर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून ठाकरे सरकारवर टीका करण्यात येत आहे. मात्र आता पूजाचं अख्खं कुटुंबच महाराष्ट्रासमोर आलं असून त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे.
'माझ्या पोटचा गोळा गेला...माझी मुलगी कशी होती हे मला माहीत आहे...ती धाडसी होती...मात्र तिची आता बदनामी थांबवा...पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करतील,' असं म्हणत पूजा चव्हाण हिच्या आईनं माध्यमांसमोर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुलीविषयी होत असलेल्या चर्चेमुळे आईला वेदना होत असून त्याच अश्रूरुपाने बाहेर पडल्याचंही पाहायला मिळालं.
(वाचा - पूजा चव्हाण प्रकरणात नव्या व्यक्तीची एण्ट्री, तपासाला कलाटणी मिळणार?)
दरम्यान, पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात थेट शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांचं नाव आलं आहे. कारण राठोड आणि पूजा चव्हाण यांच्यात फोनवर झालेल्या कथित संभाषणाच्या ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत. तसंच दोघांचे एकत्रित फोटोही समोर आले आहेत.
(वाचा - 'माझी बहीण वाघीण होती, तिची बदनामी थांबवा अन्यथा...'; पूजा प्रकरणात दिव्याची आक्रमक प्रतिक्रिया)
कारवाईला का होत आहे उशीर?
पूजा चव्हाणच्या आत्महत्येबाबत चौकशी सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात कोणावरही कारवाई होताना दिसत नाही. तसंच मुख्यमंत्र्यांनीही संजय राठोड यांना तपास पूर्ण होईपर्यंत मंत्रिपदावरून दूर होण्याच्या सूचना दिल्या नाहीत. त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या घटनेबाबत शासन आणि प्रशासन अंसवेदनशील आहे का, अशी चर्चा रंगू लागली आहे. आगामी काळात तरी याप्रकरणी काही कारवाई होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.