गडबड केली तर खबरदार; पोलिसांच्या मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा

गडबड केली तर खबरदार; पोलिसांच्या मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा

सामाजिक शांतता भंग झाली तर त्यासाठी तुम्हाला जबाबदार धरलं जाईल असा इशाराही पोलिसांनी या कार्यकर्त्यांना दिलाय.

  • Share this:

अजित मांढरे, ठाणे 20 ऑगस्ट : मनसे प्रमुख राज ठाकरेंना ईडीने नोटीस बजावल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेत. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांची वक्रदृष्टी पडली असून अशा कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. ठाणे, कल्याण आणि डोंबिवली शहरातील शेकडो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना अशा प्रकाच्या नोटीसा बजावण्यात आल्या असून काहींना हजर राहण्यास सांगण्यात आलंय. कलम 149 नुसार या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मनसेच्या अनेक नेत्यांनी आंदोलनाचे इशारे दिले होते. तर काहींनी खळ खट्याक आंदोलनाचाही इशारा दिला होता. ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून अशा प्रकारच्या नोटीसा दिल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. सामाजिक शांतता भंग झाली तर त्यासाठी तुम्हाला जबाबदार धरलं जाईल असा इशाराही या कार्यकर्त्यांना देण्यात आलाय.

राज यांचा सबुरीचा सल्ला

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना EDने दिलेल्या नोटीसवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केलीय. एक प्रसिद्धी पत्रक काढून त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत कार्यकर्त्यांना काही आदेशही दिले आहेत. राज यांना नोटीस मिळाल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. काहींनी बंदची हाक दिली होती तर महाराष्ट्रभरातल्या कार्यकर्त्यांना मुंबईत येण्यात आवाहनही करण्यात आलं होतं. मात्र खुद्द राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिलाय. 22 तारखेला मुंबईत येवू नका आणि सार्वजनीक मालमत्तेची नासधूस करू नका असा आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय. कुणी डिवचण्याचा प्रयत्न केला तरीही शांतच राहा असं आवाहनही त्यांनी केलंय.

राज ठाकरे यांनी ट्विटरवर एक पत्र टाकून सर्व कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलंय. कायदा सुव्यवस्था भंग होईल असं काहीही करू नका असंही त्यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंचं आवाहन...

माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना, सस्नेह जय महाराष्ट्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून तुमच्या माझ्यावर अनेक केसेस झाल्या, आणि प्रत्येक वेळेस आपण सर्वानी तपास यंत्रणांचा आणि न्यायालयाच्या नोटीसांचा आदर केला आहे, त्यामुळे आपण ह्या अंमलबजावणी संचानालयाच्या(ईडी) नोटिसीचा देखील आदर करू.

इतक्या वर्षात आता तुम्हाला आणि मला केसेस आणि नोटिसांची सवय झाली आहे; म्हणूनच माझी तुम्हा सर्वाना विनंती आहे की येत्या 22 ऑगस्टला शांतता राखा.

सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होणार नाही आणि सामान्य जनतेला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्या. तुम्हाला डिवचयचा प्रयत्न होणार पण तरीही तुम्ही शांत रहा.

तसंच माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो माझ्यावर तुमच्या सर्वांच्या असलेल्या प्रेमाची मला जाणीव आहे पण तरीही विनंती की कुठल्याही पदाधिकाऱ्याने अथवा महाराष्ट्र सैनिकांनी ईडीच्या कार्यालयाजवळ येऊ अथवा जमू नये.

आणि बाकी ह्या विषयावर मला जे बोलायचं आहे ते मी योग्य वेळी बोलेनच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 07:54 PM IST

ताज्या बातम्या