Home /News /mumbai /

खाकीबरोबर माणुसकीनेही जिंकलं, बेड मिळवण्यापासून डबे पुरवण्यापर्यंत हजारोंची केली सेवा

खाकीबरोबर माणुसकीनेही जिंकलं, बेड मिळवण्यापासून डबे पुरवण्यापर्यंत हजारोंची केली सेवा

लक्षणे असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या चाचणीपासून ते अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला अॅम्ब्युलन्स, बेड मिळवून देणं, जेवणाची सोय करणं, बाहेरून फळं हव नको ते आणून देणं अशी सेवा त्यांनी केली.

मुंबई, 24 एप्रिल : कोरोनासारख्या जागतिक संकटामध्ये सख्खे नातेवाईकच मदतीसाठी पुढं येत नाहीत, मग इतरांचं काय. पण काही जण आपला परका असा विचार न करता केवळ माणुसकी धर्म जपत सर्वांच्या कामी येत असतात. अशाच एका अवलियानं कोरोनाच्या या संकटकाळात हजारोंची मदत केलीय, तीही 24 तास ऑनड्युटी असताना. पोलिस दलात कर्तव्य बजावताना समाजासाठी आपण काही देणं लागतो या विचारातून त्यांनी हे काम केलं आहे. कोरोनाच्या काळात योद्धा म्हणून वावरणारी ही खास व्यक्ती आहे गौतम तुकाराम चव्हाण. जे जे मार्ग पोलिस ठाण्यात ते पोलिस शिपाई पदावर कार्यरत आहेत. पण शिपाई पदावर असले तरी त्यांनी जे जे मार्ग पोलिस ठाण्याला वेगळी ओळख मिळवून दिली आहे. चव्हाण यांची ड्युटी जे जे मार्ग हॉस्पिटलमध्ये ओपीडी विभागात आहे. त्याचा फायदा गौतम चव्हाण यांनी गरजु आणि पोलिस बांधवांसाठी करून घतेला. कोरोनानं गेल्या वर्षभरात अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना विळखा घातला होता. त्यामुळं शिपायापासून ते मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत सर्वांनाच चव्हाण यांची मदत झाली. लक्षणे असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या चाचणीपासून ते अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला अॅम्ब्युलन्स, बेड मिळवून देणं, जेवणाची सोय करणं, बाहेरून फळं हव नको ते आणून देणं अशी सेवा त्यांनी केली. केवळ पोलिस कर्मचाऱ्यांचीच नव्हे तर इतर रुग्णांनाही त्यांनी ही सेवा दिली. पोलिस दलाचं कर्तव्य बजावतानाच माणुसकीचं कर्तव्यही त्यांनी बजावलं. तब्बल 8 ते 10 हजार लोकांना त्यांनी अशाप्रकारे मदत केली. (वाचा-माणुसकीसाठी लढतायेत अब्दुल-अहमद-अलीम-आरीफ; 802 मृतदेहांवर केले अंत्यसंस्कार) चव्हाण यांनी एकही दिवस सुटी घेतली नाही. पण या दरम्यान कोरोनानं त्यांनही गाठलं. गाठलंच काय त्यांची प्रकृती एवढी गंभीर होती की 11 दिवस चव्हाण हे व्हेंटिलेटरवर होते. त्यांची पत्नी, दोन लहान मुलं आणि इतर सदस्यांनाही लागण झाली. पण या कठीण परिस्थितीवरही त्यांनी मात केली आणि महिनाभरात पुन्हा कामावर हजर झाले. त्याच जोमानं त्यांनी काम सुरू केलं. चव्हाण यांनी केवळ पोलिस कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर अनेक गोरगरिबांनाही मदत केली. कुणाला बेड मिळत नव्हते, उपचाराला पैसे नव्हते, तर कुणाकडे बिल भरण्यासाठी पैसे नव्हते. सर्वांच्या मदतीला गौतम हजर राहायचे. कदाचित त्या सर्वाची पुण्याई म्हणूनच करोनाची लागण झाल्यानंतर मरणाच्या दारातून ते सुखरुप बाहेर आले. (वाचा - समाजसेवेचा वसा : बेवारस कोरोनाग्रस्त मृतांना 'मुक्ती' देणारा खाकीतला ज्ञान'देव') गौतम यांची धडपड पाहून अनेकांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावत त्यांच्या कार्याला हातभर लावला. एक छोटीशी खानावळ चालवणारे पाटील यांनीही पुढाकार घेतला. त्यांनी अनेक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये तसंच घरी जेवण पोहोचवलं. बहुतांश वेळा तर मोफत जेवण त्यांनी पुरवलं. गौतम चव्हाण यांच्या या कामाचं तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही त्यांचं कौतुक केलं होतं. तसंच तत्कालिन मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनीही चव्हाण यांना 10 हजार रुपये बक्षीस दिलं होतं. अनेक सरकारी आणि सामाजिक संघटनांनी देखील चव्हाण यांच्या कामाची दखल घेतली.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Coronavirus, Mumbai police

पुढील बातम्या