Home /News /mumbai /

मुंबई लोकलमध्ये महिलेवर विनयभंग करून ढकलणारा नराधम अखेर पोलिसांच्या हाती

मुंबई लोकलमध्ये महिलेवर विनयभंग करून ढकलणारा नराधम अखेर पोलिसांच्या हाती

महिलेला लोकलमधून ढकलून देणाऱ्या आरोपीला लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली आहे.

मुंबई, 4 जानेवारी : धावत्या लोकलमध्ये महिलेचा विनयभंग करून तिला लोकलमधून ढकलून देणाऱ्या आरोपीला लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली आहे. 1 जानेवारीला सकाळी 11 वाजेच्या सुमारास हार्बर मार्गावरील वडाळा ते पनवेल या लोकल ट्रेनने एक महिला लोकलच्या महिला डब्यातून प्रवास करत होती. त्या डब्यात जास्त प्रवासी नसल्याचा फायदा घेत वडाळा येथून लोकल सुटल्यावर धावत्या लोकलमध्ये आरोपी राजू बंड्या पांडे उर्फ मुरगडी हा या डब्यात घुसला. आरोपी त्या महिलेजवळ गेला आणि तिचा विनयभंग केला. तसेच तिच्या मनास लज्जा निर्माण होईल अशा प्रकारचे हावभाव केले. त्यावेळी लोकल जीटीबी स्टेशनजवळ आल्याने वेग कमी होता. ही महिला लोकलच्या दरवाज्यातून आरडाओरडा करू लागल्याने आरोपीने तिला धावत्या लोकल मधून ढकलून दिले. लोकलचा वेग अतिशय कमी झाल्याने महिलेस जास्त दुखापत झाली नाही. पण हाताला मार लागला. याबाबत वडाळा लोहमार्ग पोलिसात तक्रार दिल्यावर वडाळा पोलीस आणि गुन्हे शाखा यांनी समांतर तपास सुरू केला. गुन्हे शाखेच्या वतीने एक विशेष पथक तयार करण्यात आले. याप्रकरणी तपास करताना पोलिसांनी रेल्वे स्टेशनवर असलेले सीसीटीव्ही फुटेज तसंच शहर हद्दीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. पण आरोपीचा चेहरा अस्पष्ट दिसत होता. विविध रेल्वे स्थानकात पोलीस आरोपीचा शोध घेत होते. तसंच आपल्या खबऱ्यांकडून माहितीही घेत होते. आरोपी हा नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथील रहिवासी असून तो एका हॉटेलमध्ये काम करतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर 4 जानेवारीला गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी कोपरखैरणे येथील घरी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले असता सीसीटीव्हीत असलेला चेहरा मिळताजुळता आढळला. याप्रकरणी आरोपीवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Mumbai local, Mumbai News, Mumbai police

पुढील बातम्या