Home /News /mumbai /

खरंच ग्रेट आहेस तू! रेल्वेकडून मिळालेल्या बक्षिसाची अर्धी रक्कम मयुर देणार त्या अंध मातेला

खरंच ग्रेट आहेस तू! रेल्वेकडून मिळालेल्या बक्षिसाची अर्धी रक्कम मयुर देणार त्या अंध मातेला

रेल्वे स्थानकात स्वत:च्या जीवाची बाजी लावत एका लहान मुलाचा जीव वाचवणाऱ्या जिगरबाज मयुर शेळकेचं (Mayur Shelke) सर्वत्र कौतुक होत असताना, आता त्याने घेतलेल्या निर्णयामुळे त्याच्यातील माणुसकीचं दर्शन पुन्हा एकदा समोर आले आहे.

    मुंबई, 22 एप्रिल: वांगणी रेल्वे स्थानकात स्वत:च्या जीवाची बाजी लावत एका लहान मुलाचा जीव वाचवणाऱ्या जिगरबाज मयुर शेळकेचं (Mayur Shelke) सर्वत्र कौतुक होत असताना, आता त्याने घेतलेल्या निर्णयामुळे त्याच्यातील माणुसकीचं दर्शन पुन्हा एकदा समोर आले आहे. मयुरने त्याला मिळणाऱ्या बक्षिसातील अर्धी रक्कम अंध माता संगीता शिरसाट (Sangeeta Shirsat) यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच रेल्वेकडून मिळालेल्या 50 हजारांपैकी 25 हजार रुपये मयुर शिरसाट कुटुंबाला देणार आहे. काही दिवसांपूर्वी वांगणी रेल्वे स्थानकात एक अंध आई आपल्या लहान मुलासह फलाटावरून चालत असताना तिच्या मुलाचा तोल जाऊन तो रेल्वे ट्रँकवर पडला. त्याचवेळी समोरून भरदाव वेगाने एक्सप्रेसही येत होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या 7 सेकंदात मयुर शेळके या जिगरबाज रेल्वे पाँईटमनने लहान मुलाचा जीव वाचवला. त्याच्या या कामगिरीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी त्याचं फोन करून कौतुक केले होते. 'तुमचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत. कल्पनेच्या पलीकडचं काम केलंत तुम्ही', अशा शब्दात ठाकरेंनी मयुरला कौतुकाची थाप दिली होती. मयुरने दाखवलेल्या शौर्याचे कौतुक म्हणून रेल्वेकडून (Indian Railway) त्याला 50 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. याआधी रेल्वेमंत्री पियुष गोयल (Railway Minister Piyush Goyal) यांनीही स्वतः मयूरला फोन करून कौतुक करत त्याच्या या कार्याची दखल घेतली होती. (हे वाचा-OMG! चाकासारखी गोलगोल फिरतच राहिली; चिमुरडीचा Backflip पाहूनच येईल चक्कर) काय घडलं होतं नेमकं? वांगणी स्टेशनवर शनिवारी संध्याकाळी 5 वाजून 3 मिनिटांनी एक मुलगा आपल्या आईसोबत प्लॅटफॉर्मवर चालत होता. पण चालत असताना त्या लहानग्याचा तोल गेला आणि तो मुलगा ट्रॅकवर पडला. लहान मुलगा जेव्हा रेल्वेच्या ट्रकवर पडला नेमकं त्याच वेळेला एक मेल-एक्सप्रेस त्या मुलाच्या दिशेने येत होती. त्या मुलाची आई अंध होती, ती आपला मुलगा नेमका कुठे पडला हे चाचपडत होती. बिचारी कावरी बावरी झाली होती. तिला कळेना की  नेमका तो कुठे पडला आणि तितक्यात उदयन एक्सप्रेस धडधड आवाज करत स्टेशनच्या दिशेने जोरदार वेगाने येत हाती. तो लहानगा अजून सावरला पण नव्हता आणि ट्रेनही जवळ येताना दिसली. तो मुलगा प्लॅटफॉर्मवर चढायचा प्रयत्न करत होता, पण प्लॅटफॉर्मची उंची जास्त असल्याने तो वर चढू शकत नव्हता. तितक्यात एक व्यक्ती जिवाच्या आकांताने त्या मुलाच्या दिशेने धावताना दिसली. (हे वाचा - उद्घाटनापूर्वीच दवाखाना दिला कोरोना रुग्णांसाठी; सोलापूरच्या डॉक्टरांची सामाजिक बांधिलकी) तो व्यक्ती आपल्या जिवाची पर्वा न करता त्या मुलापर्यंत पोहोचला. पटकन त्याने मुलाला उचललं आणि प्लॅटफॉर्मवर फेकून दिलं आणि तो स्वतः विजेच्या गतीने प्लॅटफॉर्मवर चढला. तो व्यक्ती म्हणजे रेल्वेचा पॉइंटमन मयुर शेळके. मयुर कर्तव्यावर होता. त्याही परिस्थितीत त्याने आपल्या हातातील हिरवा झेंडा सोडला नाही. मयुर हा पॉईंटमन आहे. पॉईंटमन म्हणजे ट्रेनला पुढे जाण्यासाठी ट्रॅक सुरक्षित आहे म्हणून हिरवा झेंडा दाखवण्याचं काम असो की जिथे ट्रॅक एकमेकांत गुंतलेले असतात तिथे सगळं आलबेल आहे हे पाहण्याचं काम करतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Railway, Railway accident, Railway tracks

    पुढील बातम्या