मुंबई, 19 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई दौऱ्यात वेगवेगळ्या विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं. या दौऱ्यातून पंतप्रधानांनी महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलं. गरिबांचे पैसे घोटाळ्यामध्ये जात होते, पण मागच्या 8 वर्षांमध्ये परिस्थिती बदलली. जगातली अर्थव्यवस्था अडचणीत असताना आपण 80 कोटी लोकांना मोफत रेशन देत आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
राज्यात महाविकासआघाडी सरकार असताना रखडलेल्या विकासकामांवरही पंतप्रधानांनी टोला हाणला. मुंबईला भविष्यासाठी तयार करणं ही डबल इंजिन सरकारची प्राथमिकता आहे. 2014 पर्यंत मुंबईत 10-11 किमी मेट्रो होती. डबल इंजिन सरकार आल्यानंतर या कामांना वेग आला, पण नंतर काही वेळ काम स्लो झालं. शिंदे-फडणवीस येताच पुन्हा काम जलदगतीने सुरू झालं, असं विधान पंतप्रधानांनी केलं.
आगामी काळात मुंबईचा कायापालट होणार. सगळ्यांसाठी मुंबईत राहणं सोयीचं होईल. मुंबईचे रस्ते सुधारण्यासाठी काम सुरू आहे, हे डबल इंजिन सरकारची प्रतिबद्धता आहे, असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं.
'मुंबईच्या विकासासाठी बजेटची कमी नाही, मुंबईच्या हक्काचा पैसा योग्य ठिकाणी लागला पाहिजे. हा पैसा भ्रष्टाचारासाठी वापरला गेला, बँकांच्या तिजोरीमध्ये ठेवला गेला. विकासाची काम रोखण्याची प्रवृत्ती असेल, तर मुंबईचं भविष्य उज्ज्वल कसं होणार?, असा सवाल पंतप्रधानांनी विचारला.
Memorable day for Mumbai! Speaking at launch of multiple development initiatives benefiting the citizens of this vibrant city. https://t.co/B5yy73uIYH
— Narendra Modi (@narendramodi) January 19, 2023
मुंबईची लोक अडचणींचा सामना करत राहिले. भाजप, एनडीएचं सरकार विकासाच्या पुढे राजकारण येऊ देत नाही. आम्ही विकासाच्या कामात ब्रेक लावत नाही. पण मुंबईत हे वारंवार झालं. पीएम स्वनिधी योजना याचं उदाहरण आहे. मुंबईच्या विकासात राजकारण आणलं गेलं, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला.
डबल इंजिन सरकार नसल्यामुळे प्रत्येक कामात रोखलं गेलं, अडथळे आणले गेले. असं पुन्हा होऊ नये म्हणून दिल्लीपासून महाराष्ट्र आणि मुंबईत चांगला ताळमेळ असलेली व्यवस्था असली पाहिजे यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असं म्हणत पंतप्रधानांनी मुंबई महापालिकेतही सत्ता द्यायचं आवाहन मुंबईकरांना केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: PM Narendra Modi