पुणे, 5 एप्रिल : परमवीर सिंह लेटर बॉम्ब प्रकरणी हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्याने अनिल देशमुखांना राज्याच्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांच्या जागी आता शरद पवारांचे एकनिष्ठ शिलेदार दिलीप वळसे पाटलांना गृहमंत्रिपदाची जबाबदारी मिळाली आहे. पण या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात की पवारांनी इतरांना डावलून दिलीप वळसे पाटलांना एवढी मोठी जबाबदारी कशी काय दिली तर त्याची बीजे ही 80 च्या दशकात सापडतात.
त्यावेळी खरंतर दिलीप वळसे पाटलांचे वडिल दत्तात्रयराव हे दिलीपरावांना पवारांकडे या सहकारी बँकेत नोकरीला लावा म्हणून घेऊन आले होते. पण चाणाक्ष दिलीपरावांनी नोकरी ऐवजी थेट पवारांचेच पीए होणं पसंत केलं आणि आपल्या राजकीय कारकिर्दीचा मार्ग सुकर करून घेतला. दिलीपराव वळसे पाटलांच्या नोकरीचा हा किस्सा दस्तुरखुद्द शरद पवारांनीच दिलीपरावांच्या एकशष्टीच्या कार्यक्रमात अगदी रंगवून सांगितला होता....
त्या कार्यक्रमात पवार म्हणाले, "दिलीपरावांचे वडील दत्तात्रयराव त्यांना घेऊन माझ्याकडे आले आणि त्यांनी मला विनंती केली की माझा मुलगा ग्रॅज्युअट झालाय, त्याला चांगल्या ठिकाणी कामाला लावा. राज्य सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष नानासाहेब सपकाळ यांना मी तसं सांगितलं पण 8 दिवसांनी मला नानासाहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही पाठवलेल्या मुलाला नोकरी करायची नाही. नंतर मी विरोधी पक्षाचा नेता होता तेव्हा दिलीपराव मला भेटले आणि मला हेच करायचं असं सांगितलं. तेव्हा मग त्यांना माझ्यासोबत ठेऊन घेतलं.. अशा पद्धतीने त्यांचा राजकीय प्रवेश झाला"
हे ही वाचा-आंबेगावात गाजा वाजा, दिलीपराव एकच राजा! बँकेची निवडणूक ते गृहमंत्रिपदाचा प्रवास
शरद पवारांनी हाच किस्सा त्यांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकातही आवर्जून लिहून ठेवलाय... पुढे 80 सालाच्या दशकात शरद पवार राज्याचे विरोधी पक्ष नेता असताना इंदिरा गांधींनी त्यांचा पक्षच फोडून टाकला आणि एका दिवशी तब्बल 60 आमदार त्यांची साथ सोडून निघले होते. अशा कठीण परिस्थितीत शरद पवार राज्याच्या राजकारणात एकटे पडलेले असतानाही दिलीपराव वळसेपाटील त्यांच्या पाठिशी ठामपणे खंबीरपणे उभे राहिले. एवढंच नाहीतर स्वीय सहाय्यक म्हणून दिलीपरावांनी पवारांच्या महाराष्ट्र दौऱ्याचं संपूर्ण नियोजन आखलं आणि हा दौरा यशस्वी करून दाखवला. तेव्हापासून आजतागायत दिलीपराव हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात त्याचेच फळ म्हणून आज पवारांनी सध्याच्या अडचणीच्या काळात गृहमंत्रिपदाची धुरा दिलीपराव वळसेपाटलांकडे सोपवलीय.