भाईंदर, 10 ऑक्टोबर: भाईंदर येथील उत्तन समुद्रकिनारी कार पार्क करणं एका कारचालकाला चांगलंच महागात पडलं आहे. समुद्र किनारी कार पार्क करून निघून गेल्यानंतर, सायंकाळच्या सुमारास समुद्रात आलेल्या भरतीमुळे कार समुद्रात वाहून (Parked Car Swept into Sea) गेली आहे. समुद्रकिनाऱ्यापासून बरचं अंतर आतमध्ये कार वाहून गेली होती. यानंतर स्थानिक मच्छिमार आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी कार बाहेर काढण्यासाठी बरेच प्रयत्न केले.
पण कारचं स्टेरिंग लॉक असल्याने आणि लाटांच्या प्रवाहामुळे कार बाहेर काढणं शक्य झालं नाही. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कारचालक शनिवारी दुपारी उत्तन नाका येथील पुलाजवळ झायलो कार घेऊन आला होता. यावेळी कारचालकानं आपली कार समुद्र किनारी पार्क केली.
हेही वाचा-VIDEO: जिलेटीनच्या कांड्यांनी घडवला स्फोट; नगरमध्ये एटीएम फोडून लाखो रुपये लंपास
यावेळी काही स्थानिक नागरिकांनी त्याला संबंधित ठिकाणी कार पार्क न करण्याचा सल्ला दिला. पण कारचालकाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत समुद्र किनारीच कार पार्क करून निघून गेला. पण त्याचा हा फाजिल आत्मविश्वास त्याला चांगलाच महागात पडला आहे. अखेर दुपारनंतर समुद्रात आलेल्या भरतीच्या लाटांसोबत ही कार समुद्रात वाहून गेली आहे. कार पाण्यात वाहून जात असताना, कार पाहण्यासाठी समुद्रकिनारी अनेकांनी गर्दी केली होती.
भाईंदर येथील उत्तन समुद्रकिनारी पार्क केलेली कार समुद्रात वाहून गेल्याचा प्रकार घडला pic.twitter.com/KTAXpD8QDp
— News18Lokmat (@News18lokmat) October 10, 2021
त्यानंतर स्थानिक मच्छिमार आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत ही कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. पण कारचं स्टेरिंग लॉक असल्यानं कार बाहेर काढणं शक्य झालं नाही. अखेर एका जेसीबीच्या मदतीने कार खेचून पाण्याबाहेर काढण्यात आली. यामुळे कारचं बरंच नुकसान झालं आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai