मुंबई, 24 मार्च : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे राज्यात खळबळ उडाली. यानंतर आता महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने या आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. निवृत्त न्यायमूर्तींच्यामार्फत याप्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. यासाठीच्या चौकशी आयोगाची लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे.
सचिन वाझे प्रकरणावरून मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. त्यानंतर परमबीर सिंग यांचं गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप करणारं खळबळजनक पत्र समोर आलं. या पत्रात गृहमंत्र्यांनी मुंबईतल्या रेस्टॉरंट आणि बारमधून महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट दिल्याचा आरोप करण्यात आला. परमबीर सिंग यांनी हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांना पाठवलं. हे पत्र समोर येताच विरोधी पक्ष असलेल्या भाजपने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पण राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही मागणी फेटाळण्यात आली. अनिल देशमुख यांचा बचाव करण्यासाठी खुद्द शरद पवार यांना मैदानात उतरावं लागलं.
दरम्यान परमबीर सिंग यांनी याप्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर आज सुनावणी झाली. या प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयात व्हावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.