मुंबई, 29 एप्रिल: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली असतानाच आता त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली आहे. आपल्या विरोधातील तक्रारींची सीबीआय चौकशी करण्याची मागणी (demand CBI probe) करत परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. परमबीर सिंग यांनी केलेल्या या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.
परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करत म्हटलं, माझ्या विरोधातील तक्रारींची देखील सीबीआय चौकशी करण्यात यावी. निष्पक्षपातीपणे सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच राज्य सरकार करत असलेली चौकशी ही देखील 100 कोटी रुपयांच्या वसूली प्रकरणाशी संबंधित असल्याचंही परमबीर सिंग यांचे म्हणणे आहे.
परमबीर सिंग यांच्यासह इतर अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा
परमबीर सिंग यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा अॅट्रॉसिटी अॅक्टसह विविध 22 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करुन हे प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असून त्याचा तपास ठाणे पोलिसांकडून करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
परमबीर सिंग यांची बदली ते देशमुखांविरोधात FIR!
काय आहे संपूर्ण प्रकरण?
ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी असताना परमबीर सिंग यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार ज्येष्ठ पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांनी पोलीस महासंचालक तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक यांच्याकडे केली होती. यासोबतच परमबीर सिंग यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांनी भिमराज घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार भिमराज घाडगे यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Mumbai, Mumbai high court, Paramvir sing