पंकजा मुंडेंचं ठरलं? भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीकडे फिरवली पाठ!

पंकजा मुंडेंचं ठरलं? भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीकडे फिरवली पाठ!

विशेष म्हणजे, मराठवाडा विभागाची बैठक औरंगाबादमध्ये पार पडली होती. या बैठकीलाही पंकजा मुंडे गैरहजर होत्या.

  • Share this:

मुंबई, 10 डिसेंबर : सत्ता गेल्यानंतर भाजपमध्ये ओबीसी नेत्यांची नाराजी उफाळून आली आहे. भाजपच्या नेत्या आणि माजी महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या प्रचंड नाराज असल्याची बाब उघड झाली आहे. आज मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीकडे पंकजांनी पाठ फिरवली आहे.

मुंबईतीत भाजपच्या विस्तारित  बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, सुभाष देशमुख, रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, संघटन मंत्री व्ही सतीश, विजय पुराणिक हे बैठकीला पोहोचले आहे. मात्र, कोअर कमिटीच्या सदस्य असलेल्या पंकजा मुंडे मात्र बैठकीसाठी पोहोचल्या नाही. या  बैठकीला येऊ शकणार नसल्याचा निरोपच पंकजा मुंडे यांनी दिला आहे.

विशेष म्हणजे, सोमवारी मराठवाडा विभागाची बैठक औरंगाबादमध्ये पार पडली होती. या बैठकीलाही पंकजा मुंडे गैरहजर होत्या. 'पंकजा यांची तब्येत बरी नाही आणि 12 तारखेला गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. त्या कामात व्यस्त असून त्यांनी हजार न राहण्याची परवानगी घेतली आहे.' अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.

परंतु, आज मुंबईतही भाजपच्या विस्तारित  बैठकीकडे पंकजांनी पाठ फिरवली आहे. गोपीनाथ गडावरच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी व्यस्त असल्यानं बैठकीला येऊ शकणार नसल्याचा असा निरोप पंकजा मुंडे यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती आहे. परंतु, पंकजा या बैठकीलाही गैरहजर राहिल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, मध्यंतरी पंकजा मुंडे यांनी, 'मला तुमच्याशी बोलायचंय, 12 डिसेंबरला आपल्या गोपीनाथगडावर भेटू' अशी पोस्ट फेसबुकवर टाकली होती. त्यांच्या या पोस्टमुळे पंकजा या भाजपातून बाहेर पडणार, अशी राजकीय चर्चा रंगली होती. परंतु, त्यांनी हे वृत्त फेटाळून लावले होते.

एकनाथ खडसेंनी घेतली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट

पंकजा मुंडे नाराज आहे तर दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हेही नाराज आहे. त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलूनही दाखवली आहे. भाजपकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहे. आज एकनाथ खडसे यांनी विधानभवनात जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तसंच सोमवारी  नवी दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.

भाजपात ओबीसी नेते का आहे अस्वस्थ?

राज्यातील सत्ता हातची जाताचं  भाजपातील पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या  नाराजीच्या निमित्तानं ते समोर आलंय. पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळेच रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडेंचा निवडणुकीत पराभव झाल्याचा जाहीर आऱोप एकनाथ खडसे यांनी केला. खडसेंच्या या भूमिकेमुळे भाजपची  कोंडी झाली असतानाचं त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू केल्यात. त्यांनी  शरद पवार तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानभवनात जाऊन भेट घेतली.

तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांची नाराजी दूर करण्यासाठी राज्यातील भाजप नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. आक्रमक पवित्रा घेतलेल्या खडसे यांचं मनधरणी पक्षातील नेत्यांकडून मनधरणी केली जातेय तर दुसरीकडं सत्ताधाऱ्यांकडून खडसेंना चुचकारण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भाजपातील या  पक्षांतर्गत वादावर ओबीसी नेत्यांनीही तोफ डागली आहे. एकनाथ खडसे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा पंकजा मुंडेंची भेट घेतली.

या  नेत्यांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. गेल्या काही दिवसात दुसऱ्यांदा खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाली. विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे पंकजा मुंडेही पक्षावर नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे आगामी काळात एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे कोणती भूमिका घेतात याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2019 10:42 PM IST

ताज्या बातम्या