..तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही; पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारला इशारा, चक्का जाम आंदोलन करणार

..तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही; पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारला इशारा, चक्का जाम आंदोलन करणार

ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण संपण्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी आज केला आहे. 26 जूनला राज्यभर चक्का जाम आंदोलनाचा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

  • Share this:

मुंबई, 18 जून : ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण संपण्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी आज केला आहे. 26 जूनला राज्यभर चक्का जाम आंदोलनाचा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. ओबीसी (OBC) समाजाला राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय आपण कोणत्याही निवडणुका होऊ देणार नसल्याचा त्यांनी इशारा दिला आहे. यासाठी प्रसंगी न्यायालयात दाद मागू असंही पंकजा मुंडेंनी सांगितले.

मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर ओबीसी प्रवर्गाच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे सध्या राज्य सरकारसमोर मोठा पेचप्रसंग उभा राहिला आहे. सध्या मराठा आरक्षण प्रश्नावरून निर्माण झालेल्या मुद्दयांवर राज्य सरकार गुंतलेले असताना आता ओबीसी आरक्षणाचा प्रश्नही निर्माण झाल्यानं सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आज ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. सुमारे तीन तास ही बैठक चालली. या बैठकीनंतर पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत आंदोलनाची घोषणा केली.

महाविकास आघाडीच्या चुकीमुळे ओबीसींचं आरक्षण गेलं आहे. त्यामुळे या सरकारला धडा शिकवण्यासाठी येत्या 26 जून रोजी चक्काजाम आंदोलन करणार असल्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी केली. भाजप सरकार सत्तेत असताना निर्णयक्षमता होती. योग्य निर्णय घेण्याची आमची नियत होती. त्यामुळे आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, अध्यादेश काढले. पण, या सरकारची मानसिकता तशी नाही. राज्य सरकार ओबीसींची बाजू मांडू शकले नाहीत म्हणून आरक्षण गेलं असा आरोप पंकजा मुंडे यांनी केला आहे.

हे वाचा - पतीची निघृणपणे हत्या करुन बदलापूर-कर्जत रोडच्या कडेला फेकला मृतदेह, नंतर पोलीस ठाण्यात केली तक्रार

यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याने समाजात अतिशय संतप्त भावना आहेत. न्यायालयात प्रकरण सुरू असताना केवळ राज्य सरकारच्या वेळकाढूपणामुळे मोठा फटका समाजाला बसला आहे.

आज भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक झाली आणि ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी 26 जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे आणि त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही. हे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला बाध्य करू आणि गरज पडली तर न्यायालयात जाऊ, अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आली.

हे वाचा - ‘या’ 3 मंत्र्यांपैकी बाबू भैया, राजू, श्याम कोण हे त्यांनाच माहीत; आशिष शेलारांचा घणाघात

या बैठकीला पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, अतुलजी सावे, डॉ. संजय कुटे, मनिषाताई चौधरी, जयकुमार गोरे, योगेश टिळेकर, चित्रा वाघ आणि इतर नेते उपस्थित होते.

Published by: News18 Desk
First published: June 18, 2021, 6:13 PM IST

ताज्या बातम्या