Home /News /mumbai /

बापरे! मुंबई-पुणे Express Way वर वर्षभरात 'इतक्या' वाहनांनी केलं वेगमर्यादेचं उल्लंघन; आकडा बघून बसेल धक्का

बापरे! मुंबई-पुणे Express Way वर वर्षभरात 'इतक्या' वाहनांनी केलं वेगमर्यादेचं उल्लंघन; आकडा बघून बसेल धक्का

'छोट्या वाहनांचे चालक खूप वेगाने वाहनं चालवतात आणि मोठ्या वाहनांना ओव्हरटेक करतात.

    दोन शहरांमधलं अंतर कमीत कमी वेळात कापता यावं म्हणून एक्स्प्रेस हायवे तयार केले जातात; पण त्यावरही जास्तीत जास्त किती वेगाने जावं, याचे काही नियम असतात; पण 'एक्स्प्रेस-वे'वरून गाडी पळायला लागली, की अनेकांच्या कानात जणू वारं भरल्यासारखंच होत असावं. त्यामुळे वेगाचं भान सुटून मर्यादेपेक्षा किती तरी जास्त वेगाने वाहनं चालवली जातात. 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वर (Mumbai-Pune Expressway) गेल्या सुमारे वर्षभराच्या काळात सुमारे तीन लाख वाहनांनी वेगमर्यादेचं उल्लंघन केलं आहे. त्यासाठी त्यांच्याकडून सुमारे 30 कोटी रुपये दंड स्वरूपात वसूल करण्यात आले आहेत. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर दुचाकी वाहनांना परवानगी नाही. या एक्स्प्रेस वेच्या हाय-स्पीड कॉरिडॉरमध्ये (High Speed Corridor) लाइट मोटर व्हेइकल्स (LMV) अर्थात कार्स आणि तत्सम चारचाकी वाहनांनी ताशी 100 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने जाऊ नये, तसंच, हेवी मोटर व्हेइकल्स (HMV) अर्थात अवजड वाहनांनी ताशी 80 किलोमीटर वेगाची मर्यादा पाळावी असा नियम आहे. या नियमांचं उल्लंघन केल्यास एक हजार रुपयांचा दंड ठोठावला जातो. अतिप्रचंड वेग हे या एक्स्प्रेस-वेवरच्या 95 किलोमीटरच्या हाय स्पीड कॉरिडॉरमधल्या गंभीर आणि प्राणघातक अपघातांचं मुख्य कारण आहे. आतापर्यंत अनेकांना त्यात जीव गमवावा लागला आहे. तरीही वेगाचं भान सुटणाऱ्या चालकांची संख्या मोठी आहे. दिवसाला या एक्स्प्रेस-वेवरून दोन्ही दिशांनी प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या सुमारे 38 हजार ते 48 हजार एवढी असते; मात्र गेल्या दीड वर्षात लॉकडाउनमुळे ही संख्या घटली असल्याचं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर किवळे (Kiwale) येथून पूर्वीच्या अमृतांजन पुलापर्यंतच्या (Amrutanjan Bridge) 52 किलोमीटरच्या टप्प्यात क्लोज्ड सर्किट टीव्ही कॅमेरे (CCTV Camera) बसवून नुकतंच एक वर्ष होऊन गेलं आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि सेव्ह लाइफ फाउंडेशन (Save Life Foundation) ही स्वयंसेवी संस्था यांनी गेल्या जुलै महिन्यात ओव्हरब्रिजसारख्या महत्त्वाच्या 11 ठिकाणी वेग मोजणारे कॅमेरे बसवले. वाहनांकडून होणाऱ्या वेगमर्यादेच्या उल्लंघनावर लक्ष ठेवण्यासाठी हे कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. 'दी हायवे सेफ्टी पॅट्रोल'कडून (HSP) मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभराच्या काळात या टप्प्यात 2.98 लाख वाहनांकडून वेगमर्यादेचं उल्लंघन झाल्याबद्दल चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात केवळ कार्सचा नव्हे, तर ट्रक्स आणि बसेसचाही समावेश आहे. या वाहनचालकांकडून एकूण 29.85 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचं HSPच्या अधिकाऱ्यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला सांगितलं. हे कॅमेरे HSPच्या उर्से इथल्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षाशी जोडलेले असल्याने नियम मोडणाऱ्या चालकांना तिथूनच दंडाचं ऑनलाइन चलन पाठवलं जातं. हे वाचा - Explainer: भारतात अश्लील चित्रपट पाहणं गुन्हा ठरतो का? पुणे HSPचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सांगितलं, की अतिवेगामुळे होणारे अपघात टाळणं हे आमचं उद्दिष्ट आहे. 'छोट्या वाहनांचे चालक खूप वेगाने वाहनं चालवतात आणि मोठ्या वाहनांना ओव्हरटेक करतात. आणीबाणीच्या परिस्थितीत वाहनं पार्क करता येण्यासाठी शोल्डर लेन्स असतात. तिथे उभ्या असलेल्या वाहनांना ही वेगाने जाणारी वाहनं जाऊन धडकतात. अशा वाहनांतल्या मृतांची संख्या जास्त असते,' असंही जाधव म्हणाले. जुलै 2020 ते जुलै 2021 या कालावधीत हाय-स्पीड कॉरिडॉरमध्ये झालेल्या 34 अपघातांमध्ये 36 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. म्हणूनच वेगाने जाणाऱ्या वाहनांच्या वेगाची नोंद आणि विश्लेषण करण्याची क्षमता असलेले कॅमेरे बसवण्यात आले आहेत. 11 ठिकाणांपैकी प्रत्येक ठिकाणावर सहाही लेन्सवरची वाहनं टिपणारे सहा कॅमेरे बसवण्यात आले आहेत, असंही जाधव यांनी स्पष्ट केलं. त्याव्यतिरिक्त हायवे इंटरसेप्टर व्हेइकल्सचाही (Highway Interceptor Vehicles) वापर पोलिसांकडून केला जातो. त्यात हाय-स्पीड लेसर गन्स (High Speed Lase Guns) असतात. त्याद्वारे पोलिसांना अतिवेगाने जाणारी वाहनं ओळखता येतात आणि त्यांना दंड ठोठावला जातो. सातत्याने लेन बदलत राहणाऱ्या वाहनचालकांवरही कारवाई केली जाते
    First published:

    Tags: Mumbai, Mumbai pune expressway, Pune

    पुढील बातम्या