मुंबई, 24 जानेवारी : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची
(Mumbai omicron cases) रुग्ण तर दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. मुंबईला तर ओमिक्रॉन झपाट्याने विळख्यात घेताना दिसतो आहे
(Mumbai coronavirus cases). मुंबईतील नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेंसिंगचा रिपोर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यात मुंबईतील धक्कादायक आकडेवारी समोरा आली आहे. ही आकडेवारी पाहूनच झोप उडेल
(Mumbao covi 19 next generation genome sequencing).
‘कोविड - 19’ विषाणूच्या जनुकीय सूत्रांचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेंसिंग) हे ऑगस्ट 2021 पासून नियमितपणे व फेरीनिहाय करण्यात येत आहे. आठव्या फेरीदरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष नुकतेच हाती आले आहेत. या 8 व्या फेरीतील चाचण्यांसाठी 373 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी 280 नमुने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील होते.
बृहन्मुंबई मनपा क्षेत्रातील 280 नमुन्यांपैकी 89% अर्थात 248 नमुने हे ‘ओमायक्रॉन’ या उप प्रकाराने बाधित असल्याचे निदर्शनास आले. 8% अर्थात 21 नमुने हे ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ या उप प्रकाराने; तर उर्वरित सुमारे सुमारे 3% अर्थात 11 नमुने हे इतर उपप्रकारांचे असल्याचे आढळून आले आहे. या 11 नमुन्यांपैकी 2 नमुने हे ‘डेल्टा व्हेरिअंट’ या उप प्रकाराने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहेत, अशी माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.
सातव्या फेरीतील निष्कर्ष
‘नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब’ मध्ये सातव्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष 31 डिसेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार कोविड बाधा झालेल्या 282 रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी 156 रुग्ण (55 टक्के) हे ‘ओमायक्रॉन’ या उप प्रकाराने; 89 रुग्ण (32 टक्के) ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ या उप प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झालं होतं. तर उर्वरित 37 नमुने (13 टक्के) हे ‘डेल्टा व्हेरिअन्ट’ या उप प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे निदर्शनास आले होते.
हे वाचा - लस न घेतलेल्यांसाठी चिंतेची बातमी; ओमायक्रॉनचा होईल असा परिणाम, WHO चा इशारा
सातव्या आणि आठव्या फेरीची तुलना करता महिनाराच्या आतच ओमिक्रॉनचे रुग्ण 55 टक्क्यांवरून 89 टक्क्यांवर पोहोचले आहे आणि हे खूपच चिंताजनक आहे.
280 चाचण्यांचे वयोगटानुसार विश्लेषण
1) 8 व्या फेरीतील चाचणींच्या निष्कर्षांचे वयोगटानुसार विश्लेषण केले असता, 280 रुग्णांपैकी 34% अर्थात 96 रुग्ण हे 21 ते 40 या वयोगटातील आहेत.
2) या खालोखाल 28% म्हणजेच 79 रुग्ण हे 41 ते 60 या वयोगटातील आहेत.
3) 25% म्हणजेच 69 रुग्ण हे 61 ते 80 या वयोगटातील आहेत.
4) 8% म्हणजेच 22 रुग्ण हे '0 ते 20' या वयोगटातील; तर 5% म्हणजे 14 रुग्ण हे 81 ते 100 या वयोगटातील आहेत.
5) चाचण्या करण्यात आलेल्या 280 नमुन्यांमध्ये 0 ते 18 या वयोगटातील 13 नमुन्यांचा समावेश होता. ज्यापैकी, 2 नमुने 0 ते 5 वर्षे या वयोगटातील, 4 नमुने 6 ते 12 वर्षे या वयोगटातील; तर 7 नमुने 13 ते 18 वर्षे या वयोगटातील होते. हे सर्व नमुने ‘ओमायक्रॉन’ या कोविड विषाणूच्या उपप्रकाराने बाधित असल्याचे आढळून आले. तथापि, या रुग्णांना कोविड बाधा झाल्याची कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत.
28० चाचण्यांचे लसीकरणानुसार विश्लेषण
1) ‘कोविड’ प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या आधारे विश्लेषण केले असता, 280 पैकी 7 रुग्णांनी लशीची केवळ पहिली मात्रा घेतलेली होती. यापैकी 6 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले; तर 2 रुग्णांना अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले.
2) लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या 174 रुग्णांपैकी 89 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी 2 रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली, तर 15 रुग्णांना अतिदक्षात विभागात दाखल करावे लागले.
3) एकूण रुग्णांपैकी 99 रुग्णांनी कोविड प्रतिबंधात्मक लशीची एकही मात्रा घेतलेली नव्हती. यापैकी 76 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तर 12 रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली आणि 5 रुग्णांना अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले.
हे वाचा - Shocking! कोरोना लस घेताच वाढली महिलेची ब्रेस्ट साईझ; डॉक्टर म्हणाले...
दरम्यान, विविध उप प्रकारातील कोविड विषाणुची होणारी लागण लक्षात घेता, ‘कोविड - 19’ विषाणू प्रतिबंधात्मक निर्देशांचे काटेकोर पालन प्रत्येकाने आपापल्या स्तरावर करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये प्रामुख्याने ‘मास्क’चा सुयोग्य वापर, दोन किंवा अधिक व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर राखणे, नियमितपणे व सुयोग्य प्रकारे साबण लावून हात धुणे, गर्दी टाळणे यासारख्या उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. तरी, सर्व मुंबईकर नागरिकांनी या उपाययोजनांची कटाक्षाने व कठोरपणे अंमलबजावणी करावी, असे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.