दसरा गाजणार Online मेळाव्यांनी, संघ, शिवसेना, भक्ती गड आणि दीक्षाभूमी; नेत्यांचं हायटेक सिमोल्लंघन!

दसरा गाजणार Online मेळाव्यांनी, संघ, शिवसेना, भक्ती गड आणि दीक्षाभूमी; नेत्यांचं हायटेक सिमोल्लंघन!

मात्र कोरोनामुळे यावेळी सर्व मेळावे हे Online होणार असून सोशल मीडियावर विचारांची लयलूट होणार आहे. नेत्यांचं हे हायटेक सिमोल्लंघन लक्षवेधी असणार आहे.

  • Share this:

मुंबई 24 ऑक्टोबर: यावेळी रविवारचा दसरा (25 ऑक्टोबर) ऐतिहासिक ठरणार आहे. कोरोनामुळे सगळेच सोहळे रद्द करण्यात आले आहे. कोल्हापूरचा शाही दसरा मेळावा पहिल्यांदाच रद्द झालाय. दसऱ्याला सगळ्यांचं लक्ष असतं ते नेत्यांच्या मेळाव्यांकडे. सगळ्यांच्या भाषणांमधून त्यांची पुढची दिशा स्पष्ट होत असते. मात्र कोरोनामुळे यावेळी सर्व मेळावे हे Online होणार असून सोशल मीडियावर विचारांची लयलूट होणार आहे. त्यांचं हे हायटेक सिमोल्लंघन लक्षवेधी ठरणार आहे.

सरसंघचालकांचं भाषण

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा हा वर्षभरातला मोठा उत्सव असतो. नागपूरला सकाळी होणाऱ्या या कार्यक्रमाकडे सर्व देशाचं लक्ष असतं. यावेळी सरसंघचालकांचं होणारं भाषण हे संघाच्या विचारांची पुढची दिशा स्पष्ट करणारं असतं.  सरसंघचालक मोहन भागवत हे स्वयंसेवकांना Online संबोधित करणार आहेत. तर मोजक्या स्वयंसेवकाच्या उपस्थितीत संघ मुख्यालयात उत्सव आणि शस्त्रपूजनाचा कार्यक्रम होणार आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा

शिवसेनेच्या स्थापनेपासून दसऱ्याला संध्याकाळी शिवाजी पार्कवर होणाऱ्या मेळाव्याचा नियम पहिल्यांदाच मोडणार आहे. यावेळी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे Online भाषण करणार आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा पहिलाच मेळावा होता. कोरोनाचा नसता तर हा मेळावा ऐतिहासिक झाला असता. गेली अनेक दशकं याच मैदानावर होणारा हा मेळावा एक विक्रमच ठरला आहे. यावेळी उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

पंकजा मुंडे यांचं भक्ती गडावरचं भाषण

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा हा गेली काही वर्ष चांगलाच गाजतो आहे. भगवान गडावर मेळाव्या घेण्यावरून वाद झाल्याने त्यांनी सावरगावला भगवान बाबांच्या जन्मगावी ‘भक्ती गड’ निर्माण केला. या मेळाव्याच्या माध्यमातून त्या दरवर्षी शक्तीप्रदर्शन करत असतात. सध्याच्या बदलत्या राजकीय पार्श्वभूमीर त्या काय बोलणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. कुणीही भक्ती गडावर येऊ नये असं आवाहनच त्यांनी केलं आहे.

दीक्षाभूमीवरचा सोहळा

या सगळ्या राजकीय कोलाहलात आणखी एक लक्षवेधी सोहळा म्हणजे नागपूरच्या ऐतिहासिक दीभाभूमी मैदानावर होणारा धम्मचक्रप्रवर्तन दीनाचा कार्यक्रम. पवित्र दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लोक नागपूरला येत असतात. कुठलंही निमंत्रण नसताना इथे उसळणारा भीमसागर हाही एक विक्रमच असतो. मात्र यावेळी हा सोहळा रद्द करण्यात आला असून सगळ्यांना Online दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 24, 2020, 11:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या