नशा करण्यासाठी चोरला कांदा, आता पोलिसांनी केला चांगलाच वांदा!

चोर काय चोरी करेल याचा नेम नाही. ठाणे शहरात कांदा चोरी करणारी दोन चोरट्यांनी पोलिसांनी जेरबंद केलं आहे.

  • Share this:

अजित मांढरे, प्रतिनिधी

ठाणे, 19 नोव्हेंबर : महागाईचा फटका एकीकडे सर्वसामान्यांना बसत असताना दुसरीकडे कांद्याचे भाव देखील वाढले आहे. कांद्याचे भाव गगनाला भिडलेले असून नागरिकांच्या डोळ्यांत पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. या महागाईने होरपळलेल्या चोरट्यांनीही आता किमती वस्तूंऐवजी ठाणे कांदे-बटाट्यांवर डल्ला मारलाय. ही चोरी कशासाठी करतात याचे कारणही धक्कादायक होतं.

चोर काय चोरी करेल याचा नेम नाही. ठाणे शहरात मोबाईल, सोनसाखळी आणि पाकीटमारी यासारख्या घटनांची नोंद पोलीस ठाण्यात केली जात आहे. त्यातच नागरिकांच्या डोळ्यांतून पाणी आणणारा कांदा आणि त्याचा जोडीदार असलेला बटाटा या दोन्हींची काही किलोमध्ये चोरी होत असल्याने ठाणे भाजी मार्केटमधील विक्रेत्यांमार्फत पोलीस ठाण्यात तोंडी तक्रारी येण्यास सुरुवात केली होती.

हे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढू लागल्याने पोलिसांनी त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मागील दोन ते तीन दिवसांपासून चोरट्यांवर नजर ठेवली. त्यानुसार, शुक्रवारी रात्री ठाणे भाजी मार्केटमधून कांद्याची ६० किलो वजनाची गोणी चोरून नेणाऱ्या कळव्याच्या महात्मा फुलेनगर येथील अविनाश कदम आणि अशोक पवार हे दोघे पोलिसांच्या हाती लागले.

चोरी झालेल्या गोणीची बाजारभावाप्रमाणे ४ हजार ८०० रुपये इतकी किंमत आहे. कांद्याची चोरी करणारे दोघे भुरटे चोर असून ते चोरलेल्या कांद्याची विक्रीकरून येणाऱ्या पैशांचा वापर नशेसाठी करणार होते.

या पकडलेल्या दुकलीमुळे कांदा -बटाटाचोरीच्या घटनांना आळा बसेल, असा विश्वास पोलिसांकडून वर्तवला जात आहे. तसंच त्या दोघांना न्यायालयात हजर केले असून त्या दोघांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी केल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांनी दिली. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

================================

First published: November 19, 2019, 8:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading