24 फेब्रुवारी : मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. लवकरच मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीसाठी आता एकच तिकीट असणार आहे. बेस्ट, रेल्वे, मोनो आणि मेट्रो वाहतुकीसाठी एकच तिकीट व्यवस्थापन प्रणाली तयार करण्यात येत आहे. या प्रणालीच्या पहिल्या टप्प्याचे काम १ मार्चपासून सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
मुंबई, ठाणे, मिरा भाईंदर आणि नवी मुंबईमधील परिवहन सेवांसाठी एकच तिकीट प्रणाली असणार आहे. ही तिकीट प्रणाली अकाऊंटबेस स्मार्ट कार्डच्या रुपात असून त्यामध्ये कुठूनही रिचार्ज करता येणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून सार्वजनिक वाहतुकीस चालना मिळणार आहे. या प्रणालीच्या कार्यचालनासाठी विशेष उद्देश वहन कंपनी स्थापन करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात बेस्ट, मोनोरेल आणि रेल्वेसाठी ही तिकीट प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतूक सेवांचा समावेश होणार असून त्यानंतर वाहनतळ, टोल, टॅक्सी, रिक्षा यांचाही समावेश या प्रणालीत करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाचणार असल्यामुळे या निर्णयाचं मुंबईकरांकडून स्वागत करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.