निवडणूक आयोगाने बजावली मनसेला नोटीस

निवडणूक आयोगाने बजावली मनसेला नोटीस

झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा वापरल्यामुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

  • Share this:

मुंबई, 12 फेब्रुवारी : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाचा मुद्दा हाती घेऊन नवीन इनिंग सुरू केली.  मात्र, झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा वापरल्यामुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अखेर निवडणूक आयोगाने याबद्दल मनसेला नोटीस बजावली आहे.

मनसेनं झेंड्यात बदल करून छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा नवीन झेंड्यात समावेश केला आहे. त्यामुळे राज्यातील शिवभक्तांमध्ये असंतोष पसरला होता. याच संदर्भात संभाजी ब्रिगेड, जय हो फाऊंडेशन आणि अखिल भारतीय मराठा महासंघाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारींची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत मनसेला नोटीस पाठवली आहे. मनसे पक्षाच्या सरचिटणीसांना ही नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये दाखल झालेल्या तक्रारींवरून पक्षाने योग्य ती कारवाई म्हणजेच एक प्रकारे बदल करण्यास सांगितलं आहे. पण, मनसे निवडणूक आयोगाच्या नोटीसीला काय उत्तर देतंय किंवा ती किती गांभिर्याने घेतंय, हे आता पहावे लागेल.

पुण्यातही मनसेविरोधात संभाजी ब्रिगेडची तक्रार दाखल

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जेव्हा भगव्या रंगाचा झेंडा आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची 'राजमुद्रा' असल्याचा झेंडा जाहीर केला होता. तेव्हापासूनच त्यावरून वाद रंगला होता. संभाजी ब्रिगेडने मनसेच्या नव्या झेंड्याला कडाडून विरोध केला. राज ठाकरेंकडून शिवराजमुद्रेचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये मनसे आणि राज ठाकरेंच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

'राजमुद्रे'चा गैरवापर करून मताचा जोगवा आम्ही मागू देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिला होता. मनसेने पक्षांच्या झेंड्यावरील राजमुद्रा तात्काळ हटवली नाहीतर थेट रस्त्यावर उतरून संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं उत्तर दिलं जाईल, अशा इशारा देखील संतोष शिंदे यांनी दिला होता.

राज ठाकरेंचा झेंड्यावर खुलासा

दरम्यान, राज ठाकरे यांनी राजमुद्रा वापरण्यावरून खुलासा केला होता. 'जो झेंडा माझ्या मनात होता. तोच हा झेंडा आहे.' असा खुलासा त्यांनी केली. गेली अनेक दिवस या झेंड्याची चर्चा सुरू होती. जेव्हा आम्ही मनसेच्या पंचरंगी झेंड्यांची चर्चा करत होतो तेव्हा खूप चर्चा झाली. त्यावेळी तो झेंडा आम्ही घेतला. परंतु, हा झेंडा निवडणुकीसाठी वापरणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

First published: February 12, 2020, 8:58 PM IST

ताज्या बातम्या